पाकिस्तानातील चित्रपटगृहांनी भारतीय चित्रपटावरील बंदी उठवली असली तरी आमिरचा ‘दंगल’ मात्र पाकिस्तानी चित्रपट गृहात झळकणार नसल्याची वृत्त आहे.  ‘दंगल’ चित्रपट पाकिस्तानमध्ये कोणत्या कारणामुळे प्रदर्शित होणार नाही, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी पाकिस्तानातील चित्रपटगृहांनी भारतीय चित्रपट दाखवणे बंद केले होते. पण पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांचे प्रदर्शित करण्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. भारतीय चित्रपटावरील बंदीमुळे पाकिस्तानी चित्रपट मालकांचे सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय सुमारे १०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही गेल्या.

पाकिस्तानी चित्रपटगृहात आजपासून भारतीय चित्रपट दाखवण्यास सुरुवात करण्यात आली. ही बंदी नवाजुद्दीन सिद्दीकी, अरबाज खान आणि अॅमी जॅक्सन यांच्या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट ‘फ्रीकी अली’ हा चित्रपट दाखवून उठवण्यात आली. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. दरम्यान आगामी ‘दंगल’ हा चित्रपट देखील पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होईल, अशा चर्चा प्रसारमाध्यमे तसेच बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. मात्र ‘दंगल’ चित्रपटाच्या वितरकांच्या प्रवक्त्यानी दिलेल्या माहितीनुसार ‘दंगल’ चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाक वितरक आणि चित्रपटगृहांच्या मालकांनी स्वेच्छेने भारतीय चित्रपटावरील बंदी हटविण्यात आली आहे. याआधी भारतीय चित्रपट निर्माता संघटनेने भारतात, पाकिस्तानी कलाकारांवर तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांवर काम करण्यावर बंदी घातली होती. चित्रपट वितरक संघटनेचे अध्यक्ष जौरेज लाशरी यांनी सांगितले की, तात्पुरती बंदी उठवण्याचा निर्णय संबंधित पक्षांसोबतच्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, दोन महिने आधी भारतीय चित्रपट निर्माता संघटनांकडून भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. यामुळेच आम्हीही भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात दाखवण्यावर बंदी घातली होती.

‘दंगल’ या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे कथानक महावीर सिंग फोगट, कुस्ती, आपल्या मुलींना या खेळामध्ये पारंगत बनविण्यासाठी झटणाऱ्या एका वडिलांची कथा आणि जिद्द याभोवती फिरणारे असल्यामुळे या चित्रपटासाठी आमिरने फार मेहनत घेतली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री साक्षी तन्वर आमिरच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये दिसणार असून काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या एका व्हिडिओमध्ये आमिर आणि नितेश तिवारी यांनी आपल्या कामाप्रती समर्पित असणाऱ्या साक्षी तन्वरचीही प्रशंसा केली होती. दरम्यान, येत्या २३ डिसेंबरला आमिर आणि त्याच्या ‘धाकड’ मुलींची ‘दंगल’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.