बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आमिर खान तब्बल चार वर्षांनंतर या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ हा ट्रेंड चर्चेत आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच आता चित्रपटाशी निगडीत एक नवी बाब समोर आली आहे. या चित्रपटाचे पटकथा लेखन अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. नुकतंच त्यांनी आमिर खानची या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर प्रतिक्रिया काय होती, याबद्दल खुलासा केला आहे.

‘लाल सिंह yचड्ढा’ हा चित्रपट दिग्दर्शक टॉम हँक्स यांच्या ‘फॉरेस्ट गंप’ हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटासोबत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी लेखन क्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतंच ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना त्यांनी या चित्रपटाची कथा आमिर खानला कशी वाटली, त्याची प्रतिक्रिया काय होती याबद्दल सांगितले. यात ते म्हणाले, “या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास सुरुवातीला आमिरने नकार दिला होता.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर कंगना रणौतची पोस्ट, म्हणाली, “…यामागे आमिर खानच”

‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाने १९९४ साली ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. अतुल कुलकर्णींनी सांगितले, “या चित्रपटाचा हिंदी रिमेक करायचा याचा निर्णय मी २००८ मध्ये घेतला. आमिर प्रॉडक्शनच्या ‘जाने तू या जाने ना’च्या प्रीमियरनंतर आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. रात्री जेवणानंतरच्या गप्पांमध्ये आवडत्या चित्रपटांचा विषय निघाला. त्यात आमिर आणि मी आम्ही दोघांनी ‘फॉरेस्ट गंप’चा उल्लेख केला. दुसऱ्या दिवशी मला १०-१५ दिवसांसाठी आऊटडोअर शूटसाठी जायचे होते, ते रद्द झाले. मोकळा वेळ असल्याने मी ‘फॉरेस्ट गंप’ पाहण्याचे ठरवले. ते पाहताना ही घटना भारतात घडली तर काय होईल? असा प्रश्न मला पडला आणि मी नोट्स काढायला सुरुवात केली. त्यावेळी मी पटकथा लिहिण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले.”

“त्यानंतर पुढे अवघ्या १० दिवसांत चित्रपटाच्या कथेचा पहिला ड्राफ्ट आणि उर्वरित चार दिवसांत दुसरा ड्राफ्ट लिहून झाला. काही दिवसांमध्येच चित्रपटाची कथा लिहून पूर्ण झाली. पण खरा अडथळा पुढे निर्माण झाला. मी आमिरकडे ही कथा घेऊन गेल्यानंतर त्याने वाचण्यासाठी त्याला वेळ दिला नाही.”

“पहिली दोन वर्षे आमिरने ती कथा वाचली नाही. असे नाही की आम्ही भेटत नव्हतो किंवा आम्ही संपर्कात नव्हतो. तो नेहमी आज वाचतो एवढंच म्हणायचा. पण नंतर शेवटी निराश होऊन मी आमिरला याबाबत स्पष्ट विचारले.” तेव्हा आमिर म्हणाला, “तू लेखक नाहीस, तू मला सांगितलंस की मी १५ दिवसात ‘फॉरेस्ट गंप’ची कथा लिहिली आहे. तू खूप जवळचा मित्र आहेस, त्यामुळे मला तुझी कथा आवडली नाही असे सांगून तुला निराश करायचे नाही. म्हणून मी कथा वाचत नव्हतो.”

आणखी वाचा – “त्यांना वाटतं माझं देशावर प्रेम नाही…” ‘लाल सिंह चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर आमिर खानची प्रतिक्रिया

यावर अतुल कुलकर्णी म्हणाले, “तू कथा वाचून फेकून दिलीस तरी चालेल. असे म्हणत मी आमिरला ती कथा वाचण्यास भाग पाडले. त्यानंतर आमिरला कथा इतकी आवडली की त्याने केवळ अभिनयच नव्हे तर चित्रपटाची निर्मिती देखील करण्याचा निर्णय घेतला.” पण त्यांनतर पुढील काही वर्षे पॅरामाउंट पिक्चर्सकडून ‘फॉरेस्ट गंप’चे राईट्स मिळवण्यात गेले. मूळ राईट्ससाठी पॅरामाउंटशीही संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी १० वर्षे लागली.” यासाठी खरोखर खूप वेळ लागल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मोठ्या प्रक्रियेनंतर अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील आमिर खानच्या लूकची विशेष चर्चा होत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.