अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’मध्ये झळकलेला अभिनेता जगदीश प्रताप बंदरी याला ६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. ३४ वर्षीय महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप होता. मृत महिला ही ज्युनियर कलाकार होती. याप्रकरणी एक अपडेट आली आहे. जगदीशने मृत महिलेला खासगी फोटोंचा वापर करून ब्लॅकमेल करण्याचा गुन्हा कबूल केला आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.

‘टीव्ही ९’ च्या रिपोर्टनुसार, जगदीशने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच तिचे फोटो वाईट हेतूने काढले होते आणि ते फोटो लीक करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले होते, असंही त्याने म्हटलं आहे. ती दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडल्याने मनात द्वेष निर्माण झाला, असंही त्याने सांगितलं. जगदीशने मान्य केलं की तो त्या मृत महिलेला पाच वर्षांपासून ओळखत होता. पण ‘पुष्पा’ चित्रपट हिट झाल्यानंतर ते वेगळे झाले, त्यानंतर अभिनेत्याने तिला ब्लॅकमेल केले, ज्यामुळे तिने आत्महत्या केली.

महिला कलाकाराच्या आत्महत्येप्रकरणी ‘पुष्पा’ फेम अभिनेत्याला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दरम्यान, जगदीशने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला काही लघुपट दिग्दर्शित केले होते. तेव्हा त्याला एक महिला भेटली होती. कालांतराने ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. पण ब्रेकअपनंतर जगदीशने तिला काही खासगी फोटो व व्हिडीओ पाठवले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती, यामुळे तिने आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पंजागुट्टा पोलिसांनी जगदीशला ६ डिसेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. आता जगदीशने त्याचा गुन्हा कबुल केला आहे.

‘ट्रॅक टॉलीवूड’च्या एका रिपोर्टनुसार, आत्महत्या करणारी महिला ही चित्रपटांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होती. तर जगदीशला ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. यामध्ये त्याने अल्लू अर्जुनच्या मित्राची भूमिका केली होती.