सातत्याने बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने आमिर खानच्या चित्रपटाबद्दल विखारी शब्दांत टीका केली होती. दर दिवशी तो असं काहीतरी वादग्रस्त ट्वीट त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून करत असतो. मध्येच त्याने त्याचं आडनाव बदलून आपल्या पत्नीचं आडनाव वापरायचं ठरवलं होतं. एकूणच केआरके हा सोशल मीडियावर कायमच ट्रोलिंगचा विषय बनलेला असतो.
आताही त्याचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. केआरके ला वादग्रस्त ट्वीट केल्यासंदर्भात पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. ही ट्वीट नेमकं कोणतं होतं, कोणासंदर्भात ही ट्वीट केलं गेलं होतं याबाबत अजून काहीच खुलासा झालेला नाही. पण असं म्हंटलं जात आहे २०२० मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. आपल्या परखड मतांमुळे आणि सडेतोड बोलण्यामुळे केआरकेच्या अडचणीत बरीच वाढ होणार आहे असंदेखील म्हंटलं जात आहे.
केआरके हा हिंदी तसेच भोजपुरी चित्रपटात काम करणारा अभिनेता आहे. ‘एक व्हिलन’ या चित्रपटात त्याने काम केलं आहे. त्याला त्याच्या ‘देशद्रोही’ या चित्रपटावरून प्रचंड ट्रोल केलं जातं. यापेक्षा जास्त केआरके हा त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी आणि त्याच्या खास शैलीतल्या समीक्षणासाठी ओळखला जातो.