अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ, उदयनराजेंची भेट, एका मागोमाग एक घडणाऱ्या या घटना व त्यानंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या टीकांमुळे गौतमी पाटील ही कायम चर्चेत आहे. आता तिच्या आडनावावरुन वेगळाच गोंधळ सुरू आहे. गौतमीचे आडनाव पाटील नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मराठा समन्वयक अशी ओळख सांगणाऱ्या राजेंद्र जराड पाटील आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांनी ‘टीव्ही ९’ला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला पाटील आडनाव लावण्याबाबत थेट इशारा दिला आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

आणखी वाचा : गौतमी पाटीलनं मराठा पदाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ इशाऱ्यावर दिलं प्रत्युत्तर; म्हणाली, “मी जर पाटील आहे तर…!”

यावरून सध्या चांगलाच वाद सुरू असून गौतमी पाटीलनेही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. “पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार” असं बेधडक वक्तव्य गौतमीने केलं आहे. एकीकडे गौतमीला असा विरोध होत असताना अभिनेते किरण माने यांनी गौतमीच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी गौतमीच्या बेधडक स्वभावाचे प्रचंड कौतुक केले असून तिच्या आडनावावरुन वाद उकरून काढणाऱ्या लोकांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. याबरोबरच त्यांनी या पोस्टमधून समाजाच्या संकुचित विचारांवरही ताशेरे ओढले आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये किरण माने लिहितात :
…”एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे…” गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगीतलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.

चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे… आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं… कसं वागायचं… स्वत:च्या घरात काय खायचं… कसले कपडे घालायचे… यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच… पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल… धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.

गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्‍यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस… पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्‍या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता ‘बिभत्स’ असं काहीही नाही. परफॉर्मन्स करताना अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्‍या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे… पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त ‘क्रेझ’ आहे.. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पॉप्युलर आहेस. तू हे यश एंजॉय कर. बर्‍याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण ‘आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस’ असं दरडावू पहाणार्‍यांना उंच उंच लांब उडवून लाव.

आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ हायेस… रुबाबात नाच, बिनधास्त नाच !”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण माने यांच्या या पोस्टची प्रचंड चर्चा होत आहे. शिवाय गौतमी पाटीलला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचंही गौतमीच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. गौतमीने आजवर अनेकदा माध्यमांसमोर आपल्या खाजगी आयुष्यावरील काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गौतमीने तिचे जन्मगाव मूळ धुळे सिंदखेडा येथील असून वय २५ असल्याचे सांगितले होते.