‘काश्मीर फाईल्स’मुळे चर्चेत आलेल्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द वॅक्सिन वॉर’ हा सिनेमा ३० सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी यशस्वी कामगिरी केली नाही. चित्रपटात कोविडच्या संघर्षावर आणि लस निर्मितीवर भाष्य करण्यात आलं आहे. यातली एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये देशाचे पंतप्रधान हे भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधत आहेत. करोनाच्या लढाईत आपल्यासाठी विज्ञान हाच मार्ग आहे असं मोदी सांगत असल्याचा संदर्भ या क्लिपमध्ये आहे. तशाच आशयाचा एक संवाद नाना पाटेकर म्हणताना दिसतात. दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी नाना पाटेकरांच्या संवादाची क्लिप X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
काय म्हटलं आहे प्रकाश राज यांनी?
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी वॅक्सिन वॉर सिनेमातला संवाद व्हायरल केला. त्यात फक्त विज्ञानाच्या आधारेच करोनाची लढाई जिंकली जाईल हे म्हटलं होतं. तीच पोस्ट रिपोस्ट करत प्रकाश राज यांनी या संवादांवर टीका केली आहे. या क्लिप मध्ये नाना पाटेकर म्हणत आहेत, “माझं पंतप्रधानांशी बोलणं झालं आहे. त्यांनी म्हटलं आहे की हे युद्ध विज्ञानाच्या आधारेच जिंकू शकतो. तुमच्याकडे लोक बरेच टोटके वगैरे घेऊन येतील, मात्र तुमचे निर्णय विज्ञानावर आधारितच असले पाहिजेत” यावरच प्रकाश राज यांनी टोला लगावला आहे. जर असं होतं, तर मग थाळ्या वाजवा, घंटा बडवा, टाळ्या वाजवा, गो करोना गो हे कुणी सांगितलं होतं?
प्रकाश राज यांनी केलेल्या या पोस्टनंतर ट्रोलिंग
प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावरच टीका केली. त्यानंतर आता सिंघम फेम जयकांत शिक्रेला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे.ज्या देशाच्या थाळीत खातात त्याच थाळीत छेद करत आहात, प्रकाश राज हा खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खलनायाकच आहेत, असं म्हणतही एका युजरने टीका केली आहे. वॅक्सिन वॉर या सिनेमात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, रायमा सेन, गिरीजा ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऑगस्ट महिन्यात प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेवरही टीका केली होती. त्यावेळीही ते ट्रोल झाले होते.