Siddharth Statement on crowd of ‘Pushpa 2’ : सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चित्रपटाचा सध्या सर्वत्र गाजावाजा सुरू आहे. या चित्रपटातील रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या अभिनयाची अनेकांना भुरळ पडली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत आहे. अशा विविध कारणांनी हा चित्रपट चर्चेत असताना दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ यानं चित्रपटासाठी पाटण्यात जमलेल्या गर्दीवरून वक्तव्य केलं आहे. त्यानं थेट चित्रपटासाठी जमलेल्या गर्दीची तुलना जेसीबीचं काम पाहण्यासाठी जमलेल्या लोकांशी केली आहे.
सिद्धार्थ सध्या त्याच्या ‘मिस यू’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात व्यग्र आहे. त्यानिमित्त त्यानं एका तमीळ यूट्युबरला मुलाखत दिली. त्यावेळी त्यानं ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँँचवेळी जमलेल्या गर्दीबाबत मत व्यक्त केलं. सिद्धार्थ म्हणाला, “भारतात गर्दी जमवणं फार मोठी गोष्ट नाही. त्यासाठी तुम्ही जेसीबीनं माती खोदण्याचं काम सुरू केलं की, गर्दी आपोआप जमा होते. त्यामुळे बिहारमध्ये गर्दी जमवणं मोठी गोष्ट नाही. गर्दी जमवणं आणि गुणवत्ता यांचा काहीच संबंध नाही. तसं असतं, तर सर्वच राजकीय नेत्यांचा विजय झाला असता. आमच्या वेळी अशी गर्दी बिर्याणी आणि एक पाकीट मिळविण्यासाठी जमत होती.”
हेही वाचा : ‘या’ मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने २५ व्या वर्षी गुपचूप उरकलं लग्न, पतीही आहे प्रसिद्ध अभिनेता; फोटो आले समोर
सिद्धार्थचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यानं केलेल्या वक्तव्याशी काही नेटकरी सहमत आहेत; तर काहींनी त्याच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
गर्दी जमली तेव्हा नेमकं काय झालं होतं?
पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदान येथे १७ नोव्हेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँँचचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तेथे मोठी गर्दी जमली होती. या कार्यक्रमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक झाले होते.
हेही वाचा : शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, गर्दी जास्त वाढल्यानंतर काही व्यक्तींनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना कलाकारांच्या जवळ जाण्यापासून थांबवले तेव्हा त्यांनी चपला फेकण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी उपस्थित गर्दीवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. त्यावर पोलिसांनी असं काहीही झालं नसल्याचं स्पष्ट केलं. फक्त ज्या व्यक्ती बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न करीत होत्या, त्यांना तेथून हटवण्यात आलं. गांधी मैदानात सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा फौजफाटा तैनात होता, असं पोलीस म्हणाले.