अभिनेत्री माही विज ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावर कायमच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच मुंबईत भर रस्त्यात तिच्या गाडीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीने मला शिवीगाळ करत बलात्काराची धमकी दिल्याचा धक्कादायक आरोपही तिने केला आहे. नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने याबाबतचा खुलासा केला आहे.
माहीने तिच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ७ मे चा आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती तिच्या गाडीला धडक देऊन छेड काढत पळताना दिसत आहे. यात त्या व्यक्तीच्या गाडीचा क्रमांकही दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना ती म्हणाली, “या व्यक्तीने आधी माझ्या गाडीला धडक दिली. त्यानंतर त्याने मला शिवीगाळ करत बलात्काराची धमकीही दिली. कृपया मुंबई पोलिसांनी या व्हिडीओची नोंद घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा.”
माहीच्या या ट्विटवर मुंबई पोलिसांनी तातडीने उत्तर दिले आहे. “तुम्ही जवळील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा, याची दखल घेतली जाईल”, असे त्यांनी या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे. विशेष म्हणजे ही सर्व घटना घडली त्यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी ताराही सोबत होती.
माही विजसोबत घडलेली घटना समजल्यानंतर अनेक चाहते संतप्त झाले आहे. तिच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी अभिनेत्रीच्या धाडसाचे कौतुक केले. तसेच अशा लोकांचा त्रास अजिबात सहन करु नये असा सल्लाही चाहते तिला देताना दिसत आहे.
Lock Upp Winner : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला कंगनाच्या ‘लॉकअप’चा विजेता
माही विज एक टीव्ही अभिनेत्री आहे. २००९ साली तिने ‘शुभ कदम’ या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘तेरी मेरी लव्ह स्टोरी’, ‘नच बलिये’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’, ‘सावधान इंडिया’, ‘झलक दिखलाजा’ यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये ती झळकली आहे.