अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने अक्षय कुमार ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात अक्षय कुमारने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत अक्षयने सातवीत नापास झाल्याचं म्हटलं आहे.

आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना अक्षय कुमार म्हणाला की, मी सातवीत नापास झालो होतो. अक्षयने हे सांगताच प्रेक्षक हसले. यावर अक्षय म्हणाला, “तुम्हाला इतका धक्का का बसला? मी खरंच सातवीत नापास झालो होतो.” याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. शोमध्ये अक्षयला तो त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला घाबरतो का? असा प्रश्नही विचारण्यात आला.

अक्षय कुमारला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. तो म्हणाला, “एकदा माझ्या वडिलांनी मला विचारलं की तुला काय व्हायचं आहे? आणि मी त्यांना लगेच सांगितलं की मला अभिनेता व्हायचं आहे. माझं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं” असं अक्षयने म्हटलं आहे.

अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयबरोबर अर्शद वारसी आहे. या चित्रपटात सौरभ शुक्लादेखील न्यायाधीशाच्या लोकप्रिय भूमिकेत आहेत. हुमा कुरेशी, अमृता राव, गजराज राव आणि सीमा बिस्वास हे प्रमुख भूमिकेत आहेत.

१९ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘जॉली एलएलबी ३’ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. चित्रपटाचे बजेट ७५ कोटी रुपये आहे, ज्यामुळे पहिल्या आठवड्याच्या शेवटी त्याचे बजेट वसूल होण्याची अपेक्षा आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२.५० कोटी रुपये कमावले आहेत.