Akshay Kumar reveals why he won’t mess with wife Twinkle Khanna : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट आज (१९ सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तो सध्या या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलीवूडमधील क्यूट कपल आहेत. ट्विंकल खन्ना चित्रपटांपासून दूर आहे, परंतु ती तिचा पती अक्षयला चिडवण्यासाठी मजेदार पोस्ट शेअर करत राहते. अभिनेता त्याच्या पत्नीबद्दलचे काही किस्सेदेखील शेअर करतो, जे चाहत्यांना खूप आवडतात.

अक्षय कुमार रजत शर्माच्या ‘आप की अदालत’मध्ये येणार आहे, ज्यामध्ये त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये त्याला घड्याळ चोरण्याबद्दलही विचारण्यात आले. त्यानंतर ट्विंकल खन्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला, ज्याच्या उत्तरावरून स्पष्ट होते की अभिनेता त्याच्या पत्नीला किती घाबरतो.

अक्षयला त्याच्या पत्नीची वाटते भीती

जेव्हा अक्षय कुमारला गमतीने विचारण्यात आले की जेव्हा तो कोणाशी हस्तांदोलन करतो, त्यानंतर समोरच्या व्यक्तीला त्याचे घड्याळ आणि रिंग आहे की नाही हे बघावे लागते. त्यावर उत्तर देताना, अक्षय होस्टला सांगतो की मी तुमचे घड्याळदेखील काढून घेऊ शकतो. जेव्हा अक्षयला त्याची पत्नी ट्विंकल खन्नाच्या घड्याळाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘जर मी तसं करण्याचा प्रयत्न केला तर ती माझा जीव घेईल,” असं तो म्हणाला. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचे लग्न २००१ मध्ये झाले होते. या जोडप्याला आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत.

अक्षय कुमारने असेही सांगितले की तो सातवीत नापास झाला होता, ज्यामुळे त्याचे वडील रागावले होते. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की त्याला काय करायचे आहे, तेव्हा त्याने सांगितले की त्याला हिरो व्हायचे आहे.

अक्षय कुमार सध्या ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. या कॉमेडी कोर्टरूम ड्रामाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आला आहे. या चित्रपटात अर्शद वारसी आणि अमृता राव यांनी सह-कलाकार म्हणून काम केले आहे. ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केला आहे.