राष्ट्रपतींच्या लेटरहेडवरून इंडिया हे नाव हटवण्यात आलं असून प्रेसिडंट ऑफ भारत असं नाव करण्यात आलं आहे. जी २० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या सहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेमधून इंडिया नाव हटवण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांनी याबाबत सर्वांत आधी ट्वीट केलं होतं. आता, बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन यांनीही अवघ्या तीन शब्दांत सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

देशाच्या राष्ट्रपतींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘President of India’ अशाच नावाने आजतागायत संबोधण्यात येत आहे. मात्र, जी २० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या सहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेमधून इंडिया शब्दच गायब करण्यात आला आहे. इंडियाच्या जागी ‘President of Bharat’ असा उल्लेख करण्यात आल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांकडून तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात येत आहे. विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत असला तरीही काहींकडून याचं स्वागत केलं जातंय.

हेही वाचा >> President of Bharat: राष्ट्रपती भवनाच्या पत्रावरील ‘त्या’ उल्लेखावरून वाद; ‘इंडिया’ नाव हटवलं?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलं आहे. ‘भारत माता की जय” एवढीच घोषणा त्यांनी ट्वीट केली आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेक कमेंट्स पडले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत अमिताभ बच्चन यांना उमेदवारी मिळणार आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे. तर, तुम्हाला इंडियाचा तिरस्कार आहे का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला आहे.

लवकरात लवकर भारतवर ट्वीट करून टाकतो, म्हणजे ईडीची धाड पडणार नाही, अशी एका नेटिझनने कमेंट केली आहे. कदाचित तुम्हाला जया बच्चन यांची भीती वाटत नसेल, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, भारतात पेट्रोल स्वस्त असेल आणि इंडियात महाग असेल असा उपरोधिक टोलाही एकाने लगावला आहे.

आपण भारत नाही म्हणणार तर काय म्हणणार? – भाजपा

“मला कळत नाहीये की यात चुकीचं काय आहे? आपला देश भारतच आहे. मग President Of Bharat म्हणण्यात अडचण कुणाला आहे? काँग्रेसला सगळ्यातच समस्या दिसते. आपण भारत नाही म्हणणार तर काय म्हणणार?” असा थेट सवाल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. १९८४ मध्ये अमिताभ यांनी अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि ऐतिहासिक विजय मिळवला होता. परंतु, १९८७ साली त्यांनी राजीनामा दिला. यापुढे राजकारणात कधीच येणार नाही, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं होतं.