ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी या जगाचा निरोप घेतला. सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या राणीने वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. क्वीन एलिझाबेथच्या निधनाने, बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पण अशातच आता अमिताभ बच्चन आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याशी संबंधीत एक किस्सा चर्चेत आला आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी अमिताभ बच्चन यांना निमंत्रण पाठवले होते आणि अमिताभ यांनी त्यांचे निमंत्रण नाकारले होते.

क्वीन एलिझाबेथ यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये बकिंगहॅम पॅलेस येथे राजघराण्याच्या वतीने ‘यूके-इंडिया इयर ऑफ कल्चर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये जगभरातून निवडक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी राणी एलिझाबेथ द्वितीय ९० वर्षांच्या होत्या. दोन्ही देशांमधला सांस्कृतिक संबंध दृढ व्हावा या हेतूने त्यांनी बॉलिवूडचे मेगास्टार आणि देशातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. मात्र, अमिताभ यांनी या भव्य कार्यक्रमाचे राणीने दिलेले निमंत्रण नाकारले होते आणि यामागे एक खास कारण होते.
आणखी वाचा- “एका युगाचा अंत…” ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर बॉलिवूड सेलिब्रेटी भावूक

अमिताभ बच्चन यांच्या पब्लिसीटी टीमकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते आणि राणीचे निमंत्रण नाकारण्याचे कारण स्पष्ट केले होते. या निवेदनात लिहिले होते- ‘होय, मिस्टर बच्चन यांना बकिंगहॅम पॅलेस येथे यूके-इंडिया वर्षाच्या सांस्कृतिक स्वागत समारंभात उपस्थित राहण्यासाठी राणी एलिझाबेथ यांच्याकडून विशेष निमंत्रण मिळाले आहे, परंतु दुर्दैवाने त्यांनी याआधी दिलेल्या कामांच्या वचनांमुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाहीत.’ अर्थातच अमिताभ यांच्यासाठी ही कारणं त्यावेळी मोठी असतील, पण आता हे निमंत्रण नाकारल्याची खंत कदाचित त्यांच्या मनात कायम राहण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-Queen Elizabeth II Death: महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निरोपाला निसर्गानेही साधला दुर्मिळ योग, पाहा Video

अमिताभ बच्चन त्यावेळी मार्च २०१७ च्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘सरकार ३’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या तयारीत व्यग्र होते. याशिवाय त्याच्याकडे अयान मुखर्जीचा ‘ड्रॅगन’, कबीर खान प्रॉडक्शनचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’सारखे चित्रपट होते. दरम्यान गुरुवारीच राणी एलिझाबेथ यांची तब्येत नाजूक असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यांना तात्काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले पण हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि बालमोरल कॅसलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.