-सॅबी परेरा

A Stitch in Time Saves Nine अशी एक इंग्रजी म्हण आहे. ही म्हण आणि त्याचा अर्थ म्हणजेच; ‘छोट्या आजाराचा वेळीच इलाज केला तर भविष्यातील मोठा अनर्थ टाळता येतो’ हे देशपांडे दांपत्याला ठाऊक असणारच! कारण देशपांडे दांपत्यातील सुहास देशपांडे हा लेखक आहे आणि त्याची बायको; सुकन्या देशपांडे ही टीव्हीवरची रिपोर्टर आहे. दोघेही बुद्धिजीवी, बऱ्यापैकी समजूतदार असल्याने आपल्या दहाबारा वर्षाच्या संसारात जे काही बिनसलंय ते पुर्वीसारखंच ठीकठाक व्हावं. त्यासाठी आपल्या संसारातील सुखाचा धागा ज्या जागी आणि ज्या क्षणी उसवायला सुरुवात झाली त्याच जागी पुन्हा जावं आणि योग्य ठिकाणी टाका घेऊन, आपल्या बाहेरून टकाटक असलेल्या मात्र आतून उसवलेल्या आपल्या संसाराची घडी पुन्हा बसवावी, आपल्या नात्यात आलेलं साचलेपण जाऊन आयुष्य प्रवाही व्हावं या उद्देशाने मिस्टर अँड मिसेस देशपांडे माथेरानच्या हॉटेल ड्रीमलँडला आले आहेत.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

लग्नानंतर याच हॉटेलात हनिमून साठी येऊन सुहास देशपांडे आणि सुकन्याने आपल्या संसाराला सुरुवात केली होती. त्याच हॉटेलात, त्याच खोलीत आता ते पुनःश्च हनिमून साजरा करावा अशी सुकन्याची इच्छा आहे आणि तिच्या हो ला हो मिळवत सुहासही तिच्या सोबत आला आहे.

सुहास आणि सुकन्या अगदी पाळणाघरापासून एकत्र वाढलेले आहेत. भातुकलीच्या खेळापासूनच त्यांचा संसार सुरु आहे. ते एकमेकांना, कदाचित गरजेपेक्षा जास्तच, ओळखून आहेत. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांनी एकमेकांसाठी त्यागही केलेला आहे, प्रसंगी आपलं स्वतःचं मन मारलेलं आहे. तरीही त्यांच्या नात्यात कुठेतरी, काहीतरी उणं आहे याची त्या दोघांना जाणीव आहे. त्या उणेपणाचा, आपल्या शिळे होऊ घातलेल्या प्रेमाचा शोध घेण्यासाठी सुहास आणि सुकन्या माथेरानच्या हॉटेलात पोहोचतात. तेव्हा ते हॉटेल त्यांना एक विचित्रच अनुभव देतं. क्षणात हॉटेलात असलेलं हे जोडपं दुसऱ्या क्षणी आपल्या घरात असतं तिसऱ्या क्षणी मानसोपचारतज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये तर पुढील क्षणात टीव्हीच्या स्टुडिओत. काळही अगदी मागून पुढे, पुढून मागे असा कसाही वर्तमान-भविष्य-भूत यांच्या दरम्यान हिंदकाळत राहतो. सुहास आणि सुकन्याचं नातं देखील प्रेम, राग, नैराश्य, आनंद, दुःख, एकमेकांची काळजी ते एकमेकांना काढलेले शाब्दिक बोचकारे अशा रोलर कोस्टर राईड मधे फिरत राहतं.

पती-पत्नीच्या नात्यातील हरवलेल्या सत्वाचा धांडोळा घेता घेता कधी एकमेकांना गोंजारणारा तर कधी बोचकारणारा हा साप-मुंगुसाचा खेळ लेखक-दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी भारी रंगतदार केलाय. नवरा-बायकोच्या नात्याला, त्या हॉटेलच्या खिडकीसारखाच वरपासून खालीपर्यंत तिरका छेद दिलेला आहे. एकीकडे हा स्त्री पुरूष नातेसंबंधातील संघर्ष रंगवत असतानाच समांतर पातळीवर एका कलावंताचा स्वतःशीच असणारा झगडाही संदेशने उत्तम दाखवला आहे. ‘पुनःश्च हनिमून’चं हे कथानक कालचं नाहीये, आजचं नाहीये, उद्याचंही नाहीये. हे कथानक कालातीत आहे. कदाचित म्हणूनच हॉटेलमधील भिंतीवरील घड्याळात केवळ आकडे आहेत, काटे नाहीयेत. सुहास-सुकन्याला भूतकाळाला पूर्णविराम देऊन आपला भविष्यकाळ नितळ, सुंदर घडवायचाय. पण त्यांच्या आयुष्यात भूत-वर्तमान-भविष्य ह्यांची अशी सरमिसळ झालीय की त्या काळाचे तुकडे करता येत नाहीयेत. वर्तमानाच्या पटलावरील भूतकाळ पुसून भविष्यकाळ लिहिता येत नाही.

वरवर पाहिलं तर मनोरंजन होईल, गंभीरपणे पाहिलं तर अंतर्मुख व्हायला होईल, ‘हे तर काय नेहमीचंच आहे’ म्हणत बेसावध राहिलो तर दचकायला होईल आणि त्रयस्थपणे पाहिलं तर आपल्याच आयुष्याचा एखादा विसंगतीयुक्त तुकडा त्यात दिसून स्वतःचंच हसू येईल असं हे नाटक आहे.

अमित फाळके आणि कौशल जोबनपुत्र या कलाकारांनी संदेश-अमृता यांना सुंदर साथ दिली आहे. अमित फाळकेंचा रंगमंचावरील वावर, छोट्या-छोट्या भूमिकांचे त्यांनी पकडलेले कंगोरे आणि त्यांची एकंदरीतच बॉडी लँग्वेज इतकी सहज आहे की यापुढे त्यांच्याकडून मोठ्या दमसासाच्या भूमिकेची अपेक्षा करायला हरकत नाही. अमृता सुभाष रंगमंचावर अक्षरशः बागडली आहे. अवखळ बालिका, लाघवी प्रेयसी, मानी पत्नी, बनचुकी पत्रकार, मातृत्व हुकलेली स्त्री अशा विविध भावछटा तिने सफाईने दाखविल्या आहेत.

संदेश कुलकर्णीने लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्हीत बाजी मारलीय. लेखनात केलेला नवरा-बायकोच्या नातेसंबंधातील गुंतागुंतीचा खोल विचार, दिग्दर्शनात नाट्यावकाशाचा केलेला अफलातून वापर, सुहासच्या बोलण्यात डोकावणारे देशोदेशीचे लेखक आणि विचारवंत, त्याच्या स्वगतातील अकृत्रिमपणा हे सर्व अनुभवावं असंच.

केवळ दोन घटका मनोरंजन एव्हढीच नाटकाकडून अपेक्षा असणाऱ्यांनी या नाटकाच्या वाट्याला जाऊ नये. प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटक याच्या संगमावरील एका महत्वाच्या पायरीचा साक्षीदार होण्याची इच्छा असणाऱ्यांनी चुकवू नये असं हे नाटक आहे.