‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेतून आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. या अभिनेत्रीचे नाव दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय राहिले आहे.

अंकिता लोखंडेच्या घरकामगार महिलेची मुलगी बेपत्ता झाली आहे. तिने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सोशल मीडियावर एक मुलगी बेपत्ता असल्याची पोस्टही शेअर केली आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे.

शनिवारी, अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने तिच्या घरकाम करणाऱ्या महिलेची मुलगी आणि तिची मैत्रीण बेपत्ता होण्याबद्दलची माहिती दिली आहे. अंकिताने त्या दोन्ही मुलींचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी त्यांचे फोटोदेखील पोलिसांना दिले आहेत आणि पोलिस एफआयआरची प्रतदेखील शेअर केली आहे.

अंकिताने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, “आमची हेल्पर कांता हिची मुलगी, तिची मैत्रीण सलोनी आणि नेहा ३१ जुलै रोजीच्या सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. त्या शेवटच्या वाकोला परिसरात दिसल्या होत्या. मालवणी पोलीस ठाण्यात यासंबंधीचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे; परंतु त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. आम्ही मुंबई पोलिसांना विनंती करतो की, त्यांनी या दोन्ही मुलींना शोधण्यात मदत करावी आणि त्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे परत आणावे.”

या प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त करताना अंकिता म्हणाली, “ते फक्त आमच्या घराचा भाग नाहीत, ते आमच्या कुटुंबापैकीच आहेत. आम्ही खूप दुःखी आहोत आणि विशेषतः मुंबई पोलीस, मुंबईकरांना आवाहन करतो की, त्यांनी या घटनेची माहिती सर्वत्र पाठवून, मुली सुरक्षितपणे परत याव्यात यासाठी सर्व प्रकारे मदत करावी. जर कोणी काही पाहिलं किंवा ऐकलं असेल, तर कृपया ताबडतोब संपर्क साधा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. तुमचा पाठिंबा आणि प्रार्थना यावेळी खूप महत्त्वाची आहे.”

अशा प्रकारे अंकिता लोखंडेने संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्याशिवाय अंकिताने सोशल मीडिया वापरकर्त्यांना या दोन्ही मुलींना कोणी पाहिले, तर त्वरित कळवावे, असे आवाहन केले आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, अंकिता लोखंडेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आणि मदतीची विनंती केली आहे.

सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉस १७ मधून चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अंकिता लोखंडे अलीकडेच तिचा पती विकी जैनबरोबर टीव्हीवरील प्रसिद्ध कुकिंग शो लाफ्टर शेफ्स सीझन २ मध्ये दिसली होती. ती त्या शोची विजेती होण्यापासून वंचित राहिली.