Ankita Lokhande Shared Video from Pavitra Rishta with Sushant Singh Rajput : अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण काढते. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या ‘पवित्र रिश्ता’ शोमधील एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये अंकिता आणि सुशांत नवरात्रीच्या एका स्पेशल एपिसोडमध्ये पारंपरिक पोशाखात दांडिया खेळताना दिसत आहेत. अंकिताने क्लिपबद्दल काहीही लिहिण्याऐवजी फक्त व्हिडीओ शेअर केला. पण, तो पाहिल्यानंतर चाहतेही भावूक झाले. हा व्हिडीओ मूळतः बालाजी टेलिफिल्म्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि अंकिता लोखंडेने तो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर री शेअर केला आहे.
‘पवित्र रिश्ता’मध्ये अंकिता आणि सुशांत यांनी अर्चना आणि मानव यांची भूमिका साकारली होती. हा शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही चांगलीच गाजली.
‘पवित्र रिश्ता’मुळे अंकिता व सुशांत सिंह राजपूतमध्ये जवळीक वाढली होती. ते जवळजवळ सात वर्षे एकत्र होते. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, काही कारणांमुळे ते वेगळे झाले. त्यानंतर अंकिताने २०२१ मध्ये विकी जैनशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
२०२४ मध्ये जेव्हा ‘पवित्र रिश्ता’ने १५ वर्षे पूर्ण केली, तेव्हा अंकिताने सोशल मीडियावर तिच्या प्रवासाबद्दल एक पोस्ट लिहिली होती. ती म्हणाली होती की, जेव्हा तिने हा शो सुरू केला तेव्हा तिला अभिनयाचा फारसा अनुभव नव्हता. सुशांतने तिला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले आणि अभिनय कसा करायचा हे शिकवले. अंकिताने लिहिले होते की ती सुशांतच्या पाठिंब्याबद्दल नेहमीच आभारी राहील.

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने चित्रपटांतही अभिनयाचा ठसा उमटवला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली अर्चना ही भूमिका प्रेक्षकांना भावली होती. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत सुशांत सिंह राजपूत मानवच्या भूमिकेत होता. मालिकेतील अर्चना व मानवची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं. सुशांत सिंह राजपूतचे जून २०२० मध्ये निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.