अभिनेत्री अनुष्का शर्माने जानेवारी महिन्यात मुलीला जन्म दिला. गर्भवती असल्याने काही काळ ती कामापासून लांबच होती आणि आपल्या बाळाच्या  देखरेखीत व्यस्त होती. पण आता तिने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कामादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

अनुष्काने जानेवारी महिन्यात आपली मुलगी वामिका हिला जन्म दिला. गरोदरपणामुळे आणि बाळाच्या जन्मामुळे घ्यावी लागणारी सक्तीची विश्रांती संपवून अनुष्का आता पुन्हा कामाला सुरुवात करत आहे. मे महिन्यात ती कामाला सुरुवात करणार होती. मात्र, दोन महिने आधीच तिने आपलं काम सुरु केलं आहे. अनुष्काने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका जाहिरातीसाठी काम करत असल्याचं दिसत आहे.

यात ती स्क्रिप्ट वाचत आहे तर सोबत मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्टही दिसत आहेत. तिचे सेटवरचेही काही फोटोज व्हायरल होत आहेत.

या फोटोंसोबतच अनुष्काचा एक जुना व्हिडिओही व्हायरल होत आहे. अभिनेत्री सिम्मी गरेवाल यांनी अनुष्काच्या घेतलेल्या मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत सिम्मी यांनी अनुष्काला लग्नाबद्दल विचारल्यावर ती म्हणत आहे की, तिच्यासाठी लग्न, मुलं हे सगळं महत्त्वाचं आहे. कदाचित आपण लग्नानंतर काम करणं बंद करू असंही अनुष्का या मुलाखतीत म्हणत आहे. २०११ सालचा म्हणजे १० वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे.

पण आज परिस्थिती वेगळी दिसते. अनुष्काने २०१७ साली भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न केलं. लग्नानंतरही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचबरोबर स्वतःची निर्मिती संस्थाही सुरु केली.

सध्या ती तिच्या क्लिन स्लेट फिल्म्स या निर्मितीसंस्थेच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. तिने अद्याप तिचा कोणतही चित्रपट जाहीर केलेला नाही.