Upcoming theatrical movie releases in August 2025 : बॉलीवूडसाठी ऑगस्ट २०२५ हा एक खास महिना असणार आहे, कारण या महिन्यात अनेक रोमांचक आणि मनोरंजनाने भरलेले चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.

रोमान्स, ॲक्शन, ड्रामा आणि कॉमेडी यांसारख्या शैलींचा उत्तम मिलाफ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या त्या आठ मोठ्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, ज्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘सन ऑफ सरदार २’

ऑगस्ट महिन्याची सुरुवात कॉमेडीपासून होणार आहे. अजय देवगण आणि मृणाल ठाकूर स्टारर ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट १ ऑगस्ट, शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट विजय कुमार अरोरा यांनी दिग्दर्शित केला आहे. तर अजय देवगण, ज्योती देशपांडे, एनआर पचिसिया आणि प्रवीण तलरेजा यांनी त्याची निर्मिती केली आहे. हा २०१२ च्या सुपरहिट अॅक्शन कॉमेडी ‘सन ऑफ सरदार’ चा सिक्वेल आहे. कथा मागील चित्रपटापेक्षा वेगळी आहे. या चित्रपटात रवी किशन, संजय मिश्रा, दीपक डोब्रियाल, चंकी पांडे, कुब्रा सैत, नीरू बाजवा, रोशनी वालिया आणि विंदू दारा सिंह यांच्याही भूमिका आहेत.

‘धडक २’

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा ‘धडक २’ हा चित्रपट शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे, ज्याचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल यांनी केले आहे. धर्मा प्रॉडक्शन, झी स्टुडिओ आणि क्लाउड ९ पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ चा आध्यात्मिक सिक्वेलदेखील आहे. हा तामिळ चित्रपट ‘पेरिएरम पेरुमल’ (२०१८) चा रिमेक होता. यावेळीही ही कथा वेगवेगळ्या जातींतील दोन प्रेमींबद्दल आहे, जे समाज आणि कुटुंबाशी लढत आहेत.

‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’

‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट रवींद्र गौतम यांनी दिग्दर्शित केला आहे. सम्राट सिनेमॅटिक्सच्या बॅनरखाली रितू मेंगी यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट शांतनु गुप्ता यांच्या ‘द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकापासून प्रेरित आहे, जो प्रत्यक्षात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कथा आहे. अनंत जोशी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा उत्तर प्रदेश (आता उत्तराखंड) च्या डोंगराळ भागातील एका मुलाच्या प्रवासावर आधारित आहे, जो नंतर देशाचा एक प्रभावशाली राजकारणी बनतो.

‘उदयपूर फाइल्स: कन्हैया लाल टेलर मर्डर’

विजय राज अभिनीत ‘उदयपूर फाइल्स: कन्हैया लाल टेलर मर्डर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन खटला आणि वादामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट आधी २७ जून रोजी प्रदर्शित होणार होता, जो नंतर ११ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला. परंतु १० जुलै रोजी उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दीर्घ लढाईनंतर तो आता ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय राज, रजनीश दुग्गल, प्रीती झंगियानी, कमलेश सावंत, कांची सिंग आणि मुश्ताक खान मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२२ मध्ये उदयपूरमध्ये झालेल्या टेलर कन्हैयालालच्या हत्येवर आधारित आहे.

‘हीर एक्स्प्रेस’

२०१२ मध्ये ‘ओह माय गॉड’ (ओएमजी) सारखा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक उमेश शुक्ला यावेळी एक कौटुंबिक-रोमँटिक ड्रामा घेऊन आले आहेत. त्यांचा नवीन चित्रपट ‘हीर एक्स्प्रेस’ ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आशुतोष राणा आणि गुलशन ग्रोव्हर सारखे दिग्गज कलाकार असून दिव्या जुनेजा आणि प्रीत कामानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘अंदाज २’

तुम्हाला अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा आणि लारा दत्ता यांचा २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अंदाज’ चित्रपट आठवत असेल. ज्येष्ठ दिग्दर्शक सुनील दर्शन आता २२ वर्षांनी त्याचा सिक्वेल ‘अंदाज २’ घेऊन येत आहेत. हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. आयुष कुमार, आकैशा आणि नताशा फर्नांडिस या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर, त्याकडून जास्त अपेक्षा ठेवणे निरर्थक आहे.

‘वॉर २’

स्वातंत्र्यदिनानिमित्त, हृतिक रोशन पुन्हा एकदा मेजर कबीरच्या भूमिकेत परतत आहे. YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट, ‘वॉर २’, या वर्षातील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक आहे. तो गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. हृतिक रोशन विरुद्ध चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या ज्युनियर एनटीआरबद्दलही प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, आशुतोष राणा, अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत. असे म्हटले जाते की, आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यात कॅमिओमध्ये दिसतील, जे ‘स्पाय युनिव्हर्स’च्या पुढील चित्रपट ‘अल्फा’मध्ये अ‍ॅक्शन करताना दिसतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘परम सुंदरी’

ऑगस्टच्या अखेरीस, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर ही जोडी मोठ्या पडद्यावर प्रेमाची जादू दाखवण्यासाठी येत आहे. त्यांचा ‘परम सुंदरी’ आता २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट तुषार जलोटा यांनी दिग्दर्शित केला आहे. दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. यापूर्वी हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर तो पुढे ढकलण्यात आला. चित्रपटाचे चित्रीकरण केरळमध्ये झाले आहे. ही कथादेखील त्याच पार्श्वभूमीवर आहे, जिथे एक उत्तर भारतीय मुलगा एका दक्षिण भारतीय मुलीच्या प्रेमात पडतो. ही कथा परम आणि सुंदरी यांच्यातील प्रेमाबद्दल आहे, ज्यांची संस्कृती आणि विचारसरणी वेगवेगळी आहे आणि त्यामुळे घडणाऱ्या विनोदाबद्दल आहे.