Baaghi 4 Trailer Out : टायगर श्रॉफ, संजय दत्त यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बागी ४’चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. आज निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यावेळी टायगर श्रॉफच्या या फ्रँचायजीमध्ये अनेक नवीन चेहरे आले आहेत.
२०२१ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणारी हरनाज संधू या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. त्याबरोबरच सोनम बाजवादेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ट्रेलरमधील संजय दत्त, उपेंद्र लिमये आणि श्रेयस तळपदे यांच्या भूमिकांनीही लक्ष वेधून घेतले आहे.
‘बागी’ फ्रँचायजीच्या चौथ्या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त आहे. रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’देखील या चित्रपटाच्या पुढे फिका आहे. टायगर श्रॉफ त्याच्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.
‘बागी ४’ हा एक नवीन धाडसी अध्याय आहे, ज्याला सीबीएफसीकडून ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे; जी नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट बॅनरसाठी ही पहिलीच वेळ आहे. ‘बागी ४’ बॉलीवूड चित्रपटांच्या अॅक्शनला एका नवीन पातळीवर घेऊन जाणार आहे.
ट्रेलरची सुरुवात, ”मी प्रेमकथा ऐकल्या आणि वाचल्या होत्या, पण आयुष्यात पहिल्यांदाच अशी अॅक्शनने भरलेली प्रेमकथा पाहिली. रोमिओ… मजनू… रांझा… सगळ्यांना अयशस्वी केले… एका बागीने”, अशा एका मनोरंजक डायलॉगने होते. या डायलॉगच्या पार्श्वभूमीवर टायगरची दमदार अॅक्शन दिसते, जी त्याच्या चाहत्यांसाठी भेटवस्तूपेक्षा कमी नाही. टायगर श्रॉफ या चित्रपटात रॉनी नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे, जो मनाने खूप भावनिक आहे आणि त्याच्या प्रेमासाठी तो कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.
रॉनी हा अलिशा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. दुसरीकडे सोनम बाजवाने रॉनीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये संजय दत्तने दमदार एन्ट्री केली आहे. तो आत येताच एक आवाज ऐकू येतो, “अजीब किस्सा देखा खुदकुशी का… दुनिया से तंग आकर एक आशिक ने मोहब्बत कर ली.” संजय दत्त रॉनीच्या आयुष्यात कोणते बदल घडवून आणतो हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. हा हाय-ऑक्टेन अॅक्शन चित्रपट ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.