दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानने इन्स्टाग्रामवर धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. बाबिलचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते काळजीत पडले आहेत.

बाबिल खान एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे, ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे. बाबिल खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

इन्स्टाग्राम अकाउंट केलं डिलीट

बाबिलबद्दल चाहत्यांना आता जास्त काळजी वाटत आहे. असे काय झाले असेल की त्याने आधी व्हिडीओ शेअर केला आणि नंतर तो डिलीट केला. आता त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट त्याने डिलीट केले आहे. बाबिल खानचे प्रोफाइल इन्स्टाग्रामवर दिसत नाही.

बाबिल काय म्हणाला होता?

बाबिल पहिल्या व्हिडीओमध्ये म्हणतो की, “शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजित सिंग असे बरेच लोक आहेत; अजून बरीच नावे आहेत, बॉलीवूड वाईट आहे. बॉलीवूड ही एक अतिशय फेक इंडस्ट्री आहे, ज्याचा मी देखील एक भाग आहे.”

बाबिलने दुसऱ्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, “बॉलीवूड ही इंडस्ट्री खोटी आहे. काहींची अशी इच्छा आहे की बॉलीवूड चांगलं व्हावं, पण ते मूर्खपणाचं आहे. माझ्याकडे तुम्हाला दाखवायला खूप काही आहे,” असे बोलून बाबिल जोरजोरात रडू लागला.

व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना बाबिलची चिंता वाटू लागली आहे. बरेच लोक म्हणत आहेत की बाबिलला लवकरात लवकर मदत दिली पाहिजे. काही लोकांना प्रश्न पडत आहे की ही त्याची सुसाईड नोट आहे का?

काही दिवसांपूर्वी इरफान खान यांची पुण्यतिथी होती. बाबिल खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. बाबिलनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या वडिलांच्या आठवणीत एक कविता लिहिली होती.

बाबिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, २०२२ मध्ये ‘काला’ चित्रपटातून बाबिलने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. २०२३ मध्ये तो ‘द रेल्वे मेन’मध्ये दिसला होता. या वर्षी त्याचा ‘लॉगआउट’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे.