अभिनेता हेमंत ढोमेचं दिग्दर्शकीय पदार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं भूमीपूजन नुकतंच झालं. ३६००० कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्याबरोबरच राज्यातील गडकिल्ल्यांचं संवर्धन करावं, असा सूर सोशल मीडियात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या विषयाला आणि शिवाजी महाराजांचं नाव वापरून केल्या जाणाऱ्या राजकारणाला वाचा फोडण्याचं काम बहुचर्चित ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटातून केलं जाणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचं नुकतंच सिंहगडावर अनोख्या पद्धतीनं लोकार्पण करण्यात आलं. मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचं लोकार्पण पहिल्यांदाच गडावर करण्यात आलं.

‘पोस्टर गर्ल’ सारखे अनेक उत्तम चित्रपट लिहिलेला अभिनेता हेमंत ढोमे ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे. हेमंतनंच या चित्रपटाचं लेखन केलं आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि गणराज प्रॉडक्शन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर लोकार्पण कार्यक्रमाला निर्माते गोपाळ तायवाडे, वैष्णवी जाधव, संजय छाब्रिया, दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील, संगीतकार अमितराज, गीतकार क्षितिज पटवर्धन, संकलक फैजल महाडिक आदी या वेळी उपस्थित होते. खास या कार्यक्रमासाठीराज्यभरातील गडकोटांच्या संवर्धनसाठी स्वयंस्फूर्तीनं कार्यरत असलेल्या २२ संस्थांचे प्रतिनिधीही आले होते. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ च्या घोषानं वातावरण दणाणून गेलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नव्हते आणि आजही नाहीत. मात्र, त्यांच्या नावानं केलं जाणारं राजकारण अत्यंत चुकीचं आहे. गडकोटांच्या संवर्धनासाठी प्रत्येक तरूणानं पुढाकार घेतला पाहिजे,’ असं जितेंद्र जोशीनं सांगितलं. ‘आज अनेक तरूण आणि संस्था गडकोटांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहेत. चित्रपटातील तरूण हे त्यांचेच प्रतिनिधी आहेत,’ असं हेमंत ढोमेनं सांगितलं. चित्रपटाच्या टीमनं मशाल पेटवून गडकोट संवर्धन करणाऱ्या तरूणांच्या हाती देत ट्रेलरचं प्रतिकात्मक लोकार्पण केलं. ट्रेलरचं लोकार्पण झाल्यानंतर सोशल मीडियात त्याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुक, ट्विटर अशा साईट्सवर हा ट्रेलर व्हायरल झाला आहे.