‘बिग बॉस १९’चे स्पर्धक प्रेक्षकांना यशस्वीरीत्या प्रभावित करीत आहेत. या स्पर्धकांमुळेच शोचा टीआरपी वाढत आहे. शोमधील सर्व स्पर्धकांचा प्रवास निश्चितच एक छाप सोडेल. त्यापैकी एक स्पर्धक आहे, ज्यानं त्याच्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं होतं. हा स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून बसीर अली आहे. ‘रोडीज’दरम्यान, बसीरनं उघड केलं की त्यानं त्याच्या भावाबरोबर मिळून त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाची व्यवस्था केली होती.

खरं तर, २०१७ मध्ये बसीरने रणविजयच्या शो ‘रोडीज’मध्ये भाग घेतला होता. ऑडिशनदरम्यान, बसीरने खुलासा केला की, जेव्हा तो फक्त पाच वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला दुसऱ्या स्त्रीसाठी सोडून गेले. त्याच्या आईने एकट्याने त्याला आणि त्याच्या मोठ्या भावाला वाढवले. आईला एकटे पाहून, दोन्ही भावांनी एका विशिष्ट वयानंतर तिचे दुसरे लग्न लावून दिले. बसीरने असेही उघड केले होते की, ते खूप भांडायचे; परंतु त्याच्या आईने सांगितलेल्या एका गोष्टीने त्याचे मन बदलले.

‘बिग बॉस १९’च्या सुरुवातीला बसीर अलीच्या खेळाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तो घरात फायनलिस्ट मानला जात होता. गेल्या काही आठवड्यात त्याचा खेळ बदलला आहे. आता त्याने शोमध्ये नेहल चुडासामाबरोबर प्रेमसंबंध सुरू केले आहेत. प्रेक्षकांना हा लव्ह अँगल किती आवडतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

बसीरने याआधी अनेक रिअ‍ॅलिटी शोमधून स्वत:ची अशी एक वेगळी छाप निर्माण केली आहे. बसीर अली हा २९ वर्षीय मॉडेल, अभिनेता व टीव्ही सेलिब्रिटी आहे. तो हैदराबादचा रहिवासी असून, २०१७ मध्ये ‘MTV रोडीज रायझिंग’ हा शो जिंकल्यानंतर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याच वर्षी त्यानं ‘स्प्लिट्सव्हिला’ सीझन १० देखील जिंकला. त्या शोमध्ये त्याची जोडी नैना सिंगबरोबर होती आणि त्यांनी एकत्रितपणे विजेतेपद मिळवलं.

रिअ‍ॅलिटी शोमधून नाव कमावल्यानंतर बसीरने अभिनयाकडे मोर्चा वळवला. त्याने झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’मध्ये शौर्य लुथराने ही भूमिका साकारली होती. या मालिकेची एकता कपूरने निर्मिती केली असून, त्यामध्ये श्रद्धा आर्य, मानित जोरा व धीरज धूपर यांसारख्या कलाकारांबरोबर बसीरने काम केले आहे.