वाईला २५ जानेवारीला माझं चित्रीकरण होतं.. रात्री साडेअकराला ते संपलं.. तिथून पहाटे चार वाजता मी घरी पोहोचलो.. जागरण झालं होतंच.. पण २६ जानेवारीला नाटकाचे चार प्रयोग करायचं हे ठरवलेलंच होतं.. त्यामुळे घरी आल्यावर फक्त दोन तास झोपलो.. त्यानंतर घरून सकाळी आठ वाजता निघालो ते थेट शिवाजी मंदिरसाठी.. त्यानंतर बोरिवली आणि थेट वाशी.. या दिवशी झोप पूर्ण झालीच नव्हती, पण एकही प्रयोग करताना थकवा जाणवला नाही, कारण चार प्रयोग करायची माझी प्रबळ इच्छाशक्ती होती. चारही प्रयोग करून घरी गेलो तेव्हा थकवा जाणवला. काहीच करण्यासाठी त्राण उरलेलं नव्हतं, पण मी या चार प्रयोगांनी तृप्त झालो होतो’, असं भाऊ कदम सांगत होता.

२६ जानेवारीला भाऊने ‘व्यक्ती आणि वल्ली’ व ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकांचे प्रत्येकी दोन प्रयोग केले. पण हे प्रयोग त्याने एकाच नाटय़गृहात केले नाहीत. ‘व्यक्ती आणि वल्ली’चा पहिला प्रयोग त्याने सकाळी शिवाजी मंदिरमध्ये केला, त्यानंतर ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकाचे सलग दोन प्रयोग बोरिवलीच्या ‘प्रबोधनकार ठाकरे’ नाटय़गृहात केले, त्यानंतर भाऊ निघाला तो वाशीला ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाच्या रात्रीच्या प्रयोगासाठी. यापूर्वी प्रशांत दामले यांनी २००१ साली ‘गेला माधव कुणीकडे’, ‘एका लग्नाची गोष्ट’ आणि ‘चार दिवस प्रेमाचे’ या तीन नाटकांचे पाच प्रयोग करत व्रिकम केला होता.

‘नाटक ही माझी आवड आहे. छंदाचं व्यवसायात रूपांतर झालं. २००१ साली नाटय़सृष्टीला मरगळ आली होती. नाटकांकडे जास्त लोकं वळत नव्हती. त्यावेळी नाटकाचे तिकीट लावून पाच प्रयोग होऊ शकतात, हे मला दाखवायचं होतं आणि हे पाचही प्रयोग हाऊसफुल्ल होऊ शकतात, यामुळे एक वेगळा संदेश जनमानसात पोहोचला,’ असं दामले सांगत होते.

काही जण म्हणतील की भाऊ ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात फक्त एक प्रवेश करतो. संपूर्ण नाटक तो रंगमंचावर नसतो. पण या धावपळीच्या जगात तीन नाटय़गृहांमध्ये चार प्रयोग करणं हे नक्कीच कौतुकास्पदच. या चार प्रयोगांपैकी ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाचे दोन प्रयोग विविध ठिकाणी होते, याचीही नोंद घ्यायला हवीच. चार प्रयोग करताना भाऊ प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचेल की नाही, याचे दडपण सहकलाकारांना होतेच. पण प्रत्येक ठिकाणी भाऊ प्रयोगापूर्वी काही मिनिटे आधी हजर होता हा त्यांचा अनुभव बरंच काही सांगून जातो.

या चार प्रयोगांदरम्यान बऱ्याच गमती घडल्या. याबाबत भाऊ म्हणाला की, ‘ मी जेव्हा पहिला प्रयोग करायला गेलो. तेव्हा सहकलाकार सांगत होते, हे ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटक आहे, माहितीए ना. ‘शांतेच्या काटर्य़ाचे’ संवाद बोलू नकोस. त्यानंतर बोरिवलीला पोहोचलो तेव्हा ‘शांतेच्या काटर्य़ाचे’ सहकलाकार सांगत होते. हा ‘व्यक्ती आणि वल्लीचा’ प्रयोग नाही. ते संवाद डोक्यातून काढून टाक . त्यानंतर वाशीला गेल्यावर सहकलाकारांचा जीव भांडय़ात पडला. साऱ्यांनीच विचारपूस केली. पण त्यानंतरही हे ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटक आहे लक्षात ठेव, असं सांगायला ते विसरले नाहीत. सारीच गंमत. पण या गंमतीमागे काळजी होतीच’, भाऊ कळकळीने सांगत होता.

दामले यांनी पाच प्रयोग केले खरे, पण त्यानंतर या अतिताणाचा त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला.  ‘पाच प्रयोग केले, समाधान वाटलं. पण त्यानंतर दोन वर्षे मी जास्त प्रयोग करून शकलो नाही. कारण या पाच प्रयोगांनंतर माझा आवाजच फुटत नव्हता. मला बोलताच येत नव्हतं. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांमध्ये मला जास्त प्रयोग करता आले नाहीत, अशी प्रांजळ कबुली प्रशांत दामले यांनी दिली. सततच्या व्यग्र कार्यक्रमांमुळे भाऊला व्यायाम किंवा योगा असं काही करणं जमत नाही. पण या चार प्रयोगांनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी भाऊला काळजीपोटी थोडं दटावलं. ‘ही अशी धावपळ कशाला करतोस? आता केलंस ते ठीक, पण त्यानंतर सर्व वैद्यकीय चाचण्या सर्वप्रथम करून घे आणि त्यानंतर कामाला सुरुवात कर,’ असं खास मांजरेकरी शैलीत त्यांनी आपल्याला सुनावल्याची आठवणही भाऊ ने सांगितली. मराठी रंगभूमी म्हणजे प्रयोगशाळाच. २००१ साली दामले यांनी आणि आता भाऊने ऐन भरात असताना एका दिवसात असे विविध ‘प्रयोग’ केले. या दोघांमध्ये एक समान धागा होता आणि तो म्हणजे रंगभूमीबाबतची तळमळ. त्यामुळे या तळमळीपोटीच रंगभूमीवर असे प्रयोग पाहण्याचा योग यापुढेही येवो, हीच इच्छा.

प्रसाद लाड prasad.laad@expressindia.com