scorecardresearch

“ज्यांनी गर्भवतीवर बलात्कार केला…” बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर जावेद अख्तर संतापले

बिल्किस बानो प्रकरणावर जावेद अख्तर यांचं ट्वीट चर्चेत.

“ज्यांनी गर्भवतीवर बलात्कार केला…” बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर जावेद अख्तर संतापले
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Bilkis Bano case: गुजरात न्यायलयाने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. बिल्किस बानो यांनीदेखील “आपल्यावर अत्याचार व आपल्या सात कुटुंबीयांची हत्या करणाऱ्या ११ दोषींच्या जन्मठेपेची शिक्षा शिथिल करत त्यांना मुक्त केल्याने मी सुन्न झाले आहे. न्यायव्यवस्थेवरील माझ्या श्रद्धेस धक्का पोहोचला असून, ती डळमळली आहे.’’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर अनेक सामाजिक आणि राजकीय नेते मंडळी तसेच सेलिब्रेटींनीही नाराजी व्यक्त केली होती. अशात आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान राजकीय किंवा सामाजिक मुद्द्यांवर आपलं मत निर्भिडपणे मांडणारे जावेद अख्तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्या या ट्वीटचीही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणातील दोषींच्या सुटकेवर देशभरातून नाराजी आणि संतापाचा सूर आहे.
आणखी वाचा- Raju Srivastav Video : राजू श्रीवास्तव यांनी केला होता यमराज आणि मृत्यूचा उल्लेख, व्हिडीओ व्हायरल

जावेद अख्तर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून दोषींच्या सुटकेवर नाराजी व्यक्त करत एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “ज्यांनी पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केली, त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले. या लोकांना पुष्पहार घालण्यात आला आणि मिठाईही खाऊ घालण्यात आली. याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या समाजात काहीतरी अत्यंत चुकीचं घडतंय आणि हे खूप गंभीर आहे.”

नेमकं काय घडलं होतं?
गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यास आग लावून झालेल्या हिंसाचारानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या भीषण दंगलीत दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रणधिक्पूर गावात बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या वेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. तसेच त्यांच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीसह सात जण कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारचा निर्णय १९९२ च्या माफी धोरणानुसार या दोषींच्या याचिकेवर विचार करावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने या ११ दोषींना मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा- Bilkis Bano Case: ‘दोषी ब्राह्मण असून चांगले संस्कार’ म्हणणाऱ्या भाजपा आमदारावर ओवेसी संतापले; म्हणाले “नशीब गोडसेला…”

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने या ११ आरोपींना २१ जानेवारी २००८ रोजी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यांची ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. या दोषींनी १५ वर्षांपेक्षा जास्त काळ कैदेत व्यतीत केल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने सर्वोच्च न्यायालयात शिक्षेत सवलतीची याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने या प्रकरणी एक समिती स्थापन केली. या समितीच्या निर्णयानुसार या ११ जणांच्या मुक्ततेचा निर्णय झाला होता.

दोषींच्या सुटकेनंतर काय म्हणाल्या बिल्किस बानो?
“या निर्णयावर तातडीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मला शब्दच सुचत नव्हते. मी अजूनही सुन्नच आहे. या स्थितीत कोणाही महिलेला न्याय कसा मिळेल? माझा आपल्या देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. हा धक्का पचवून, मी पूर्ववत जगू लागले होते. परंतु या दोषींच्या सुटकेने माझी अवघी शांतता हिरावली आणि आता माझा न्यायावरील विश्वास डळमळीत झाला आहे. माझे दु:ख आणि डळमळलेला विश्वास माझ्यापुरता नसून न्यायालयांत न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येक महिलेला अशाने न्याय मिळेल का? याबद्दल आता शंका निर्माण झाली आहे. त्यांच्याबद्दल मला दु:ख वाटते. या दोषींच्या मुक्ततेनंतर गुजरात सरकारने माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी,” अशी प्रतिक्रिया बिल्किस बानो यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या