Bill Gates In Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : पहिल्यांदाच बिल गेट्स भारतीय टीव्ही शोमध्ये दिसणार आहेत. लवकरच ते एकता कपूरच्या ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी २’ या टीव्ही शोमध्ये दिसणार आहेत. त्याकरिता ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी २’चे संपूर्ण कलाकार खूप उत्सुक आहेत. शोची मुख्य अभिनेत्री स्मृती इराणी यांनी याला ‘एक ऐतिहासिक क्षण’, असे म्हटले आहे.
स्टार प्लसवरील नवीन प्रोमोमध्ये, स्मृती इराणी यांची व्यक्तिरेखा असलेल्या तुलसी विराणी व्हिडीओ कॉलवर कोणाशी तरी बोलताना दिसतात. त्या पाहुण्यांचे त्यांच्या अद्वितीय ‘जय श्री कृष्णा’ने स्वागत करतात आणि दुसरी व्यक्ती म्हणजेच बिल गेट्स होते. बिल गेट्स तुलसी यांना ‘जय श्री कृष्णा’ म्हणाले. तुलसी म्हणतात, “अमेरिकेतून थेट आमच्या कुटुंबाशी संपर्क साधला,आम्हाला खूप छान वाटत आहे. आम्ही तुमची वाट पाहत होतो.” बिल गेट्स यांनी उत्तर दिले, “धन्यवाद तुलसीजी.”
पीटीआयच्या वृत्तानुसार, बिल गेट्स हे ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी २’मध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीत ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी २’ मध्ये बिल गेट्स यांच्या उपस्थितीची पुष्टी केली. त्या म्हणाल्या, “भारतीय मनोरंजनासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला आणि मुलांचे आरोग्य बऱ्याच काळापासून मुख्य प्रवाहाच्या चर्चेतून बाहेर राहिले आहे. हे पाऊल ते बदलण्यासाठी एक मोठा प्रयत्न आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “जगातील सर्वांत आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी एकाला लोकप्रिय भारतीय टीव्ही कथेत आणणे ही केवळ एक सहकार्याची बाब नाही, तर ती जागरूकता आणि बदलाची सुरुवात आहे.”
रिपोर्टसनुसार, बिल गेट्स दोन एपिसोड्समध्ये दिसतील. हे खास एपिसोड्स २४ व २५ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहेत. हे दोन्ही एपिसोड्स पूर्णपणे आरोग्याच्या जागरूकतेवर लक्ष केंद्रित करतील, विशेषतः गर्भवती महिला आणि नवजात शिशूंच्या आरोग्याच्या बाबतीत. बिल गेट्स यांचा हा कॅमिओ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनबरोबरील भागीदारीतून तयार करण्यात आला आहे, जे फाऊंडेशन जगभरातील आरोग्य आणि शिक्षणाच्या संबंधित मुद्द्यांवर काम करते.
२००० ते २००८ पर्यंत घराघरात गाजलेली ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’ ही टीव्हीवरील मालिका आता सीझन २ सह परत आली आहे. पण, या वेळी कथा केवळ नात्यांपुरती मर्यादित नाही. तर, हा शो आता सामाजिक आणि तांत्रिक मुद्देदेखील जोडत आहे. बिल गेट्स यांचा हा कॅमिओ याच नवीन विचाराचा एक भाग आहे.