शाहरुखच्या बंगल्याबाहेरील रॅम्पवर पालिकेचा हातोडा

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने आपल्या आलिशान गाडीसाठी बंगल्याबाहेरच्या रस्त्यावरच बांधलेल्या अनधिकृत रॅम्पवर पालिकेने अखेर शनिवारी पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला.

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने आपल्या आलिशान गाडीसाठी बंगल्याबाहेरच्या रस्त्यावरच बांधलेल्या अनधिकृत रॅम्पवर पालिकेने अखेर शनिवारी पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला. रॅम्प पाडण्यासाठी आलेला खर्च शाहरुख खानकडून वसूल करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आपली आलिशान व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी शाहरुख खानने वांद्रे (प.) येथील माऊंट मेरी चर्चजवळील ‘मन्नत’ बंगल्याबाहेरील रस्ताच अडविला होता. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. या संदर्भात परिसरातील अनेक रहिवाशांनी पालिकेकडे तक्रारही केली होती. मात्र काँग्रेसशी जवळीक असलेल्या शाहरुख खानच्या रॅम्पवर हातोडा चालविण्यास पालिका अधिकारी धजावत नव्हते. याबाबत स्थानिक रहिवाशांनी खासदार पूनम महाजन यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून या रॅम्पवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती.स्थानिक रहिवाशांची तक्रार आणि पूनम महाजन यांच्या मागणीची गंभीर दखल घेत सीताराम कुंटे यांनी ‘मन्नत’ बाहेरील रॅम तोडून टाकण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर पालिकेने कारवाई केली. पालिकेचे ३५ अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटदाराचे ४० कामगार, तसेच पोलीस अधिकारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
या कारवाईसाठी नेमका किती खर्च आला याची जुळवाजुळव करण्यात येत असून हा खर्च शाहरुख खानकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bmc demolishes ramp outside shah rukh khans mannat