Sanjay Dutt Big Revelation About Money Earned While In Jail : संजय दत्तने त्याच्या व्यावसायिक आयुष्यात खूप यश मिळवले आहे. संजय दत्तने एकदा तुरुंगाची हवासुद्धा खाल्ली होती. त्याच्या आयुष्यातील चढउतार अनेकांना माहीत आहेत. आईच्या निधनानंतर त्याच्या मनावर झालेला आघात, पोलिसांकडून झालेली अटक आणि तुरुंगात काढलेले दिवस, या संजूबाबाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी कनेक्शनप्रकरणी संजयला तुरुंगात जावं लागलं होतं. आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये तो तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. अलीकडेच संजय दत्त द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये आला. त्याने सांगितले की, तो तुरुंगात छोटी-छोटी कामे करून पैसे कमवत होता.

संजय दत्तने सांगितलं की, तुरुंगात असताना तो खुर्च्या आणि कागदी पिशव्या बनवत असे. संजूबाबा तुरुंगात असताना स्वतःचा रेडिओ शो चालवायचा. याशिवाय संजयने एक नाटक कंपनी निर्माण केली होती. या नाटक कंपनीमध्ये संजूबाबा स्वतः दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळायचा. त्यावेळी खून करून शिक्षा भोगत असलेले कैदी संजूबाबाच्या या नाटकात काम करायचे. तुरुंगातील आरोपींबरोबर मिळून संजूबाबा नाटकाची गोष्ट लिहायचा. संजय दत्तला त्याच्या या कामांसाठी जेलमध्ये असताना पगार मिळायचा, असा खुलासा त्याने केला आहे.

संजय दत्त पुढे म्हणाला की, तुरुंगात असताना हे पैसे कमावणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. पैसे मिळवण्यामागे त्याचे दोन उद्देश होते. पहिलं म्हणजे, पैसे त्याच्यासाठी दुय्यम गोष्ट होती. त्याला कोणत्या ना कोणत्या कामात यानिमित्त व्यग्र राहायचे होते. दुसरं म्हणजे, त्याला स्वावलंबी बनून काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता. त्याने जमा केलेले पैसे त्याची पत्नी मान्यता दत्तला दिले होते. संजय दत्तची खलनायकी भूमिका असलेला ‘बागी ४’ चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे.

संजय दत्तने खुलासा केला की एकदा तो तुरुंगात दाढी करत होता, तेव्हा एक व्यक्ती आली; त्याने त्याला विचारले की तो किती वर्षांपासून तुरुंगात आहे. तेव्हा त्या व्यक्तीने त्याला सांगितले की तो १५ वर्षांपासून तुरुंगात आहे. जेव्हा त्याने याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याने दुहेरी हत्याकांड केले आहे. हे ऐकून संजय दत्तला धक्का बसला होता.