कोविड काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा चांगलाच सुळसुळाट झाला आणि जगभरातील कलाकृती बघून लोकांची आवडच पूर्णपणे बदलली. आज सगळं सुरळीत झालं असून वेगवेगळे चित्रपट यायला सुरुवात झाली आहे तरी प्रेक्षक मात्र फार कमी चित्रपटांसाठीच गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या देशात ओटीटी कंटेंट बघणाऱ्यांची संख्या ही दिवसागणिक वाढत चालली आहे.

बॉलिवूडमधील कित्येक लोकांनी ओटीटीचा पर्याय निवडलेला आहे, तरी अजूनही आपले काही मोठे कलाकार ओटीटीकडे वळलेले नाहीत. अभिनेता वरुण धवन याने नुकतंच याविषयी भाष्य केलं आहे. शाहिद कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ओटीटीवर लवकरच पदार्पण करावं अशी इच्छा वरुणने व्यक्त केली आहे. ‘पिंकव्हीला’च्या मुलाखतीमध्ये वरुण म्हणाला, “सिद्धार्थ आणि शाहिद लवकरच एका मोठ्या सीरिजमधून पदार्पण करणार आहेत आणि त्याबद्दल त्यांनी माहितीदेखील दिली आहे. पण या दोघांखेरीज अमिताभ बच्चन यांनीही लवकरच ओटीटीवर एका लिमिटेड सीरिजमध्ये झळकायला हवं असं मला वाटतं. त्याच्यासाठी मी कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मची मेंबरशिप घ्यायला तयार आहे.

याच मुलाखतीमध्ये जेव्हा त्याला ओटीटीवर कोणत्या अभिनेत्याने येऊ नये असा प्रश्न विचारला तेव्हा मात्र वरुणने एकच नाव घेतलं. वरुण म्हणाला, “सलमान खान याने ओटीटीवर कधीच येऊ नये असं मला वाटतं, कारण त्यांचे चित्रपट हे थिएटरमध्येच अनुभवायचे असतात. ईदच्या दिवशी जेव्हा सलमानचा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा मोठ्या पडद्यावर त्यांना बघताना मला प्रचंड आनंद होतो.”

आणखी वाचा : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीच्या मृत्यूचं ६० वर्ष न उलगडलेलं रहस्य, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर जोडलं गेलं होतं नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकताच वरुण धवन ‘जुगजुग जियो’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर अनिल कपूर, नितू सिंग आणि कियारा आडवाणी हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. वरुण सध्या त्याच्या आगामी ‘भेडीया’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. लवकरच त्या चित्रपटाची झलक आपल्याला पाहायला मिळेल.