बॉलिवूड अभिनेत्री चित्राशी रावतच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. चित्राशीच्या भावाचा कार्गो शिपमध्ये झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला. चित्राशीने एका वेबसाइटची लिंक सुषमा स्वराज यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली. ही लिंक शेअर करत तिने तो माझा भाऊ आहे. कृपया मला मदत करा, अशी विनंतीही केली आहे. या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, १९ वर्षीय कमर्चाऱ्याचा ‘बॉक्सशिप’मध्ये पडून बेल्जियममध्ये मृत्यू झाला. २९ मार्चला ही घटना घडली.

वेबसाइटच्या वृत्तानुसार, वादळामुळे गुळगुळीत झालेल्या भागावरुन लोखंडाच्या शिडीच्या सहाय्याने तो तेल आणि पाण्याचा अलार्म तपासण्यासाठी जात होता. तेव्हाच पाय घसरल्यामुळे डोकं आपटून १६ मीटर उंचीवरुन तो खाली पडला. वेबसाइटच्या मते, काहीच दिवसांपूर्वीच तो त्या जहाजावर कामासाठी रुजू झाला होता. चित्राशीच्या ट्विटचे उत्तर देताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, ‘हो, आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. तुम्हाला कोणती मदत हवी आहे ते सांगा’.

यावर चित्राशीने ट्विट करत म्हटले की, ‘उत्तर देण्यासाठी धन्यवाद मॅडम. आम्हाला त्याचा मृतदेह लवकरात लवकर घरी आणायचा आहे. भावाचा मृतदेह आमच्यापर्यंत यायला १२ दिवस लागतील असं ते म्हणतायेत.’ चित्राशीच्या या ट्विटला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे तिला नक्कीच दिलासा मिळाला असेल. त्यासोबत स्वराज यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली आहे.