टाटा ग्रुपच्या तनिष्क या दागिण्यांच्या ब्रॅण्डची एक नवी जाहिरात सध्या चर्चेत आहे. या जाहिरातीमधून लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार होत असल्याचं सांगत अनेकांनी त्यावर टीका केली. सोबतच सोशल मीडियावर #BoycottTanishq हा हॅशटॅगही ट्रेण्ड झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तनिष्कने ती जाहिरात मागे घेतली. मात्र, यावर बॉलिवूड दिग्दर्शक ओनिर यांनी ट्विट करुन त्यांचं मत मांडलं आहे.

सोशल मीडियावर #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेण्ड झाल्यानंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेतली आहे. त्यामुळे ओनिरने या प्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून खंत व्यक्त केली आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे. ‘तनिष्क ज्वेलर्स खरंच फार निराशजन्य आहे हे. फारच वाईट’, असं ओनिर म्हणाला. त्याच्या या ट्विटनंतर अनेक त्यावर कमेंट केली आहे. यात काहींनी त्याच्यावर टीकास्त्रदेखील डागलं आहे.

आणखी वाचा- Love Jihad प्रसाराचा टाटा ब्रँडवर आरोप, जाहिरात घेतली मागे

आणखी वाचा- “एक हिंदू म्हणून आपण अशा Creative Terrorists पासून…”; तनिष्क प्रकरणावरुन कंगना संतापली

दरम्यान, मुस्लिम कुटुंबामध्ये लग्न करुन गेलेल्या हिंदू तरुणीसाठी तिच्या सासरचे लोकं हिंदू प्रथांप्रमाणे डोहाळजेवण करण्याचा निर्णय घेतात असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. तनिष्कने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीप्रमाणे सुनेवर प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये या तरुणीचे लग्न झालं आहे. सामान्यपणे ज्या गोष्टी कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेतं. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ या जाहिरातीमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र अनेकांना ही जाहिरात फारशी आवडलेली नाही. या जाहिरातीमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.