गेल्या सहा महिन्यांमध्ये केवळ दोन ते तीन बॉलीवूडपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली असली तरी शंभर ते दोनशे कोटींची नेहमीची धावही त्यांना पकडता आलेली नाही. हॉलीवूडपटांच्या भारतातील कमाईवर बॉलीवूडचा गाडा ओढणाऱ्या इंजिनला खऱ्या अर्थाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून गती मिळणार आहे. मोठय़ा सणांनाच आपले बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्याच्या बॉलीवूड कलाकारांच्या फंडय़ामुळे जुलै महिन्यात येणाऱ्या ईदपासून ते डिसेंबपर्यंत सगळे मोठे चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होणार आहेत. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या ‘सुलतान’पासून बॉलीवूडला लागलेले आर्थिक ग्रहण सुटेल, असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे.
बॉलीवूडला गेल्या सहा महिन्यांत मराठी चित्रपट आणि हॉलीवूडकडून जबरदस्त स्पर्धा सहन करावी लागली आहे. किंबहुना, एकमेव ‘द जंगल बुक’ या हॉलीवूड अॅनिमेशनपटाला २०० कोटी रुपयांच्या जवळपास मजल मारता आली आहे. तर मराठी चित्रपटानेही ५० ते १०० कोटी रुपयांपर्यंत उडी मारली.
त्या तुलनेत केवळ अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेला ‘एअरलिफ्ट’ आणि आता प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल्ल ३’ या दोनच चित्रपटांना शंभर कोटींच्या वर कमाई करता आली आहे. त्यापाठोपाठ टायगर श्रॉफ-श्रद्धा कपूर जोडीचा ‘बागी’ आणि सोनम कपूरचा ‘नीरजा’ या दोनच चित्रपटांनी चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे अर्थातच कोटय़वधींची उलाढाल अपेक्षित असलेली ही इंडस्ट्री पूर्णपणे पुढच्या सहा महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या मोठय़ा चित्रपटांवर अवलंबून आहे. त्याची सुरुवात सलमान खानच्या ‘सुलतान’पासून होईल.
दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या चित्रपटांना तिकीटबारीवर हमखास यश मिळतेच. गेल्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटालाही चांगले यश मिळाले होते. मात्र तरीही सलमान आणि शाहरूख खानसाठी ईदचा मुहूर्त जास्त महत्त्वाचा ठरला आहे.
यंदा या स्पर्धेत शाहरूखने आपला ‘रईस’ तब्बल सहा महिन्यांनी पुढे ढकलत सलमानला हा मुहूर्त मोकळा करून दिला असल्याने तोच तिकीटबारीवरचा ‘सुलतान’ ठरणार आहे.

‘मोहेंजोदारो’ ‘बार बार देखो’ पिंक’ खास आकर्षण
‘सुलतान’ पाठोपाठ १२ ऑगस्टला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्याच्या पुढच्या महिन्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि करिना कपूर अशी वेगळी जोडी घेऊन आलेला ‘बार बार देखो’ आणि अमिताभ बच्चन यांची वेगळी भूमिका असलेला ‘पिंक’ हे बॉलीवूडचे खास आकर्षण ठरणार आहे. सप्टेंबरमध्येच सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला ए. आर. मुरूगडोस दिग्दर्शित ‘अकिरा’ हा अॅक्शनपट आणि भारतीय क्रिकेट कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हेही प्रदर्शित होणार आहेत. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याचे पदार्पण असेलला राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित प्रेमपट ‘मिर्झिया’ने ऑक्टोबरची सुरुवात होईल. याच महिन्यात खूप काळानंतर करण जोहरचे दिग्दर्शन असलेला ‘ऐ दिल है मुश्कील’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अजय देवगण दिग्दर्शित आणि अभिनित ‘शिवाय’ हा बिग बजेट चित्रपटही पाहायला मिळेल. नोव्हेंबरमध्ये ‘रॉक ऑन’ आणि ‘कहानी’ या दोन गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वल प्रदर्शित होणार आहेत. डिसेंबरची सुरुवात आदित्य चोप्राचे दिग्दर्शन असलेल्या ‘बेफिक्रे’ने होणार असून वर्षांची सांगता आमिर खानच्या ‘दंगल’ने होणार असल्याने पुढच्या सहा महिन्यांतच बॉलीवूडमध्ये तिकीटबारीवर खरी ‘दंगल’ अनुभवता येणार आहे.