आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण या चित्रपटाची निर्मिता करताना सगळे खूप घाबरलो होतो, असा खुलासा आमिर खानने केला आहे. जावेद अख्तर यांनी हा चित्रपट एक दिवसही चालणार नाही, असं म्हटलं होतं.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “हा चित्रपट तयार करताना आम्ही खूप घाबरलो होतो. या चित्रपटाची स्क्रिप्ट जावेद अख्तर यांनी ऐकली होती. ते या चित्रपटाचे गीतकार होते. जावेद साहेबांनी मला फोन केला आणि ते म्हणाले ‘तुम्ही काय मूर्खपणा करताय?’ मी विचारलं की जावेद साहब काय झालं? आणि त्यांनी मला लगेच भेटायला बोलावलं. आशुतोषने चित्रपटाची कथा त्यांना ऐकवली होती. जावेद अख्तर यांनी मला फोन करून तातडीने भेटायला बोलावलं.”

“मी भेटायला गेल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही हा चित्रपट का तयार करताय? हा चित्रपट एक दिवसही चालणार नाही.’ मी विचारलं का? या चित्रपटाची कथा तर खूप चांगली आहे. ते म्हणाले, ‘पाहा.. एकही क्रीडा चित्रपट आजवर चाललेला नाही, क्रिकेटचा एकही चित्रपट चाललेला नाही. तुम्ही अवधी भाषेत बोलताय, त्यामुळे चित्रपट कोणाला समजेल आणि आता सगळे महागडे कपडे घालतायत, स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग करतायत आणि तुम्ही धोतर-बंडी घालून गावात हा चित्रपट करताय.’ त्यांच्याकडे असे बरेच मुद्दे होते,” असं आमिरने सांगितलं.

हेही वाचा – अनुराग कश्यपचे चाहते आहात? त्याचे ‘हे’ १० चित्रपट एकदा तरी नक्की पाहा, OTT वर आहेत उपलब्ध!

बच्चन यांच्या आवाजामुळे फ्लॉप होण्याची भीती

पुढे आमिर म्हणाला, “त्यांचा एक मुद्दा होता की तुम्ही चित्रपटाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला आहे, ज्या ज्या चित्रपटांना अमिताभ यांनी आवाज दिला होता, ते फ्लॉप झाले होते. हे मलाही बच्चन साहेबांनी सांगितलं होतं, जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो. मी ज्या ज्या चित्रपटांना आवाज दिले ते फ्लॉप झाले ते लक्षात ठेव, बाकी मला इथे आवाज द्यायला काहीच अडचण नाही, असं बच्चन म्हणाले होते. जावेद अख्तर म्हणाले तुम्ही हेही करून झालंय. आता तर तुमचा चित्रपट चालणारच नाही. पण आम्हाला चित्रपटाच्या कथेवर विश्वास होता, पण तो खूप कठीण चित्रपट होता. त्या काळी तो खूप महागही होता. ३ तास ४२ मिनिटांचा चित्रपट आणि पाच गाणी. हा चित्रपट तेव्हाच्या ऑस्करच्या टॉप ५ च्या यादीत गेला होता.”

हेही वाचा – Chhaava: ‘छावा’ने स्त्री २ सह ‘या’ ब्लॉकबस्टर सिनेमाला टाकलं मागे, तिसऱ्या आठवड्यातील कमाई तब्बल…

‘लगान’चा आंतरराष्ट्रीय प्रवास

चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दल आमिर म्हणाला, “हा चित्रपट लुकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता, तिथले प्रेक्षक हे जर्मन, फ्रेंच, इटालियन बोलणारे आहेत. तिथे क्रिकेट खेळ नाही. १० हजार प्रेक्षक लगान पाहत होते, त्यांना क्रिकेटबद्दल काहीच माहीत नव्हतं. आम्हाला वाटलं यांना चित्रपट समजेल की नाही, जवळपास ४ तासांचा सिनेमा आहे. लगानने तिथे बेस्ट फिल्म ऑडियन्स अवॉर्ड जिंकला होता. तिथूनच लगानच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात झाली.”

हेही वाचा – आलिया भट्ट बाल्कनीतून इतरांच्या घरात डोकावते, स्वतःच्या विचित्र सवयीबद्दल म्हणाली, “मी त्यांच्या बेडरूममध्ये…”

“मी तर माझे चित्रपट फिल्म फेस्टिव्हल्सला पाठवतही नाही. कारण त्यांना प्रिंट लवकर हवी असते, प्रिंट पाठवली की पायरसी होते. तर त्या फेस्टिव्हल डायरेक्टरने माझ्याकडे चित्रपट मागितला, कारण तिला तो चित्रपट आवडला होता. मी तिला नकार दिला. तिने कारण विचारल्यावर मी पायरसी सांगितलं. त्यांचा नियम असतो की त्यांना तो चित्रपट समितीतील सदस्यांना दाखवायचा असतो. ती मला म्हणाली की तुम्ही प्रिंट पाठवली नाही, तर तुमचा चित्रपट फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडला जाणार नाही. मी म्हटलं ठिके. मला फेस्टिव्हलमध्ये पाठवायचा नाहीये, तर सिनेमा रिलीज करायचा आहे. तिला चित्रपट इतका आवडला होता की १५ जूनला चित्रपट रिलीज झाल्यावर तिने तिच्या समितीला लंडनला पाठवलं आणि सांगितलं की थिएटरमध्ये चित्रपट पाहून या, हा चित्रपट मला फेस्टिव्हलमध्ये पाहिजे. तिनेच हा चित्रपट लुकार्नोला नेला आणि तिथूनच चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला. मी त्यासाठी फार काही केलं नव्हतं,” असं आमिरने नमूद केलं.