Ira Khan Complete Mental Health Therapy Journey बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही नेहमीच मेंटल हेल्थ (मानसिक स्वास्थ्य) या विषयावर खुलेपणाने बोलत आली आहे. तिनं यापूर्वी सांगितलं होतं की, ती डिप्रेशनशी झुंज देत आहे आणि तिनं यातून बाहेर पडण्यासाठी थेरपीही सुरू केली आहे. आयरा मानसिक स्वास्थ्याशी संबंधित ‘अगत्सू’ (Agatsu) नावाची एक संस्थादेखील चालवते, जी लोकांना मानसिक स्वास्थ्याविषयी माहिती देते आणि अशा लोकांना आधारही देते.

डिप्रेशनशी झुंज देणारी आयरा खान आता हळूहळू यातून बाहेर पडत आहे. गेली अनेक वर्षं डिप्रेशनचा सामना करणारी आयरा आता यातून बरी होत असून याबद्दल तिनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आयरा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. तसेच स्वत:च्या मानसिक आरोग्याबद्दलही ती वेळोवेळी खुलेपणानं व्यक्त होताना दिसते.

अशातच आयरानं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली असून, या पोस्टमधून आयरानं सांगितलं आहे की, तिचं थेरपीवरचं उपचार घेणं आता संपलं आहे. या पोस्टमध्ये आयरानं म्हटलंय, “१३ ऑक्टोबर रोजी मी माझं शेवटचं थेरपी सेशन घेतलं. आठ वर्षं आणि आठवड्यातून तीन वेळा सायको अ‍ॅनालिसिस थेरपी केल्यानंतर, आता माझं थेरपीचं पर्व संपलं आहे.”

पुढे आयरा सांगते, “लोक विचारतात – ‘मग तू आता बरी झालीस का?’ तर सत्य असं आहे की, मी अजूनही औषधं घेत आहे आणि कदाचित पुढेही काही काळ घ्यावी लागतील. पण, आता थेरपी घेणं थांबवलंय; याचा अर्थ, माझ्या थेरपिस्ट आणि मला असं वाटतं की मी बरंच काही शिकले आहे.”

पुढे ती म्हणाली, “मी आता माझं आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीनं जगायला सुरुवात केली आहे आणि स्वतःची जबाबदारी घेत, स्वतःची काळजी घेणं आणि आयुष्यात मजा करणं विसरू नये – हे मला कळालंय. औषधांच्या मदतीनं भविष्यात येणाऱ्या डिप्रेशनच्या टप्प्यांना मी हाताळू शकेन आणि जर नाहीच जमलं, तर मदतीची विनंती करणं मला माहीत आहे.”

आयरा खान इन्स्टाग्राम पोस्ट

त्यानंतर आयरा तिचा आनंद व्यक्त करीत म्हणते, “मी थेरपीतून ‘पास’ झालेय… मी ‘थेरपी ग्रॅज्युएट’ झालेय… खरं तर हे असं कोणी म्हणत नाही; पण मला असं म्हणायला आवडतंय…” दरम्यान, थेरपी बंद केल्याचा आनंद आयरानं शेअर केलेल्या फोटोंमधूनही जाणवत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आयरा खूप खुश आणि उत्साही दिसत आहे.