Aamir Khan on Making Remakes: बॉलीवूडमधील काही कलाकार हे त्यांच्या चित्रपटांसाठी, अभिनयासाठी ओळखले जातात. आमिर खान हा अशाच लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अभिनेता आता लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मला खूप ट्रोल केले गेले…

काही दिवसांपूर्वी जेव्हा ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हा अभिनेत्याचा हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपट चॅम्पियन’ चित्रपटाचा कॉपी आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले. अनेकांनी असेही म्हटले की आमिर त्याच्या अपयशातून काहीही शिकला नाही. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉफ ठरला होता. ‘फॉरेस्ट गंप’ या १९९४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा लाल सिंग चड्ढा हा रिमेक होता. आता अभिनेत्याने त्याचा रिमेक बनवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

आमिर खानने नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, “‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटानंतर मला अनेकांनी म्हटले की तुम्ही परत रिमेक बनवत आहात. लाल सिंग चड्ढाच्या वेळी मला खूप ट्रोल केले गेले होते. पण, मला वाटत नाही की रिमेक बनवल्याने माझी क्रिएटीव्हिटी कमी होते. कारण- ते काम माझ्यासाठी नवीन आहे. नवीन दृष्टीकोणातून मी त्याच्याकडे बघतो.”

आमिर खान पुढे विल्यम शेक्सपिअरच्या नाटकाचे उदाहरण देत म्हणाला, “जर मी शेक्सपिअरचे नाटक करत असेन तर मी स्वत:देखील त्यासाठी कष्ट घेतो. माझी स्वत:ची क्रिएटिव्हिटी वापरतो. त्यामुळे मी रिमेक चित्रपट बनवतो ही चर्चा मला वायफळ वाटते. जेव्हा मी ‘गजनी’ चित्रपट केला तेव्हा तो आधीच तमिळमध्ये झाला होता. पण, मी त्याकडे वेगळ्या दृष्टीकोणातून बघतो. माझ्या प्रेक्षकांसाठी माझी एनर्जी वापरून मी सिनेमा बनवतो. त्यामुळे मला वाटते की माझे काम त्यांच्यापेक्षा वेगळे आहे.”

दरम्यान, सितारे जमीन पर या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुखदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. २० जूनला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष बाब म्हणजे त्यानंतर सितारे जमीन पर कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही. तर हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.

याआधी २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता ‘सितारे जमीन पर’ चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.