अभिनेता आमिर खान व जिनिलीया देशमुख लवकरच ‘सितारे जमीन पर’मधून झळकणार आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदाच हे दोघे एकत्र काम करत आहेत. ‘सितारे जमीन पर’ २० जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच आमिर खानने नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याची सहकलाकार जिनिलीयाच्या कामाबद्दल भरभरून कौतुक केलं आहे.

‘रिएल बॉलीवूड हंगामा’च्या मुलाखतीमध्ये आमिर खान जिनिलीयाचं कौतुक करत म्हणाला, “तिने तिच्या पहिल्या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं होतं आणि मला असं वाटतं की, तिने सातत्याने चांगलं काम केलं आहे. तिचं प्रत्येक काम खूप खरं आणि प्रभावी वाटतं. मला तिच्याबरोबर काम करताना खूप मज्जा आली. ‘सितारे जमीन पर’मध्ये आमची केमिस्ट्री खूप चांगली झाली आहे.” आमिर खानने अभिनेत्रीचं कौतुक केल्यानंतर जिनिलीया म्हणाली, “हे माझ्यासाठी खूप आहे, आज मला खूप गाढ झोप लागणार आहे.”

‘सितारे जमीन पर’ हा २००७ साली आलेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. तर या चित्रपटामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत असून जिनिलीया त्याच्यासह महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत असून यामध्ये त्यांनी सुनीता व गुलशन अशा भूमिका साकारल्या आहेत. आमिर खान व जिनिलीया पहिल्यांदाच एकत्र चित्रपटातून झळकणार असल्याने त्यांच्यातील केमिस्ट्री पाहणं रंजक ठरेल.

‘सितारे जमीन पर’ नंतर जिनिलीया ‘राजा शिवाजी’ या तिचा नवरा व अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या चित्रपटाचं काम सुरू असून १ मे २०२६ ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मराठीसह हिंदी, तेलुगू, कन्नड व मल्याळम अशा इतर भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मराठी-हिंदीतील दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट आमिर खानसाठी खास आहे, कारण यातून त्याच्या आई झीनत खान पहिल्यांदाच चित्रपटामध्ये झळकणार असल्याचं अभिनेत्याने स्वत: सांगितलं आहे. आमिर खानने या चित्रपटामधून पहिल्यांदाच त्याच्या आईबरोबर काम केलं आहे. आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता नुकताच राज शमानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, २० जूनला ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित झाल्यानंतर तो त्याचं ड्रीम प्रोजेक्ट महाभारतवर काम करणार आहे. यामध्ये त्याने कदाचित हा त्याचा शेवटचा चित्रपटही असू शकतो असंही म्हटलं होतं.