Aamir Khan plans movie based on Raja Raghuvanshi Meghalaya honeymoon murder case: बॉलीवूड अभिनेता आमिर खान हा त्याच्या विविध चित्रपटांसाठी ओळखला जातो. विशेषत: खऱ्या घटनांवर आधारित तो चित्रपट बनवत असल्याचे दिसते. नुकताच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अभिनेत्री जिनिलीया देशमुख प्रमुख भूमिकेत दिसली होती.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर आमिर खान काढणार चित्रपट?
आता अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘टाईम्स नाऊ’ने दिलेल्या माहितीनुसार, मेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशीच्या हत्येवर त्याचा पुढचा चित्रपट असणार आहे. त्याचा आगामी प्रोजेक्ट मेघालयमधील मर्डर हनिमून केसवर आधारित मर्डर मिस्ट्री थ्रिलर असू शकतो.
आमिर खान या हत्येतील आरोपी पत्नी सोनम आणि पीडित पती राजा रघुवंशी यांच्या केसमधील अपडेट्सवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याने स्वतः त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी तपशिलांचा मागोवा घेतला आहे आणि चर्चा केली आहे, असे समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. आमिर खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होऊ शकतो. प्रोडक्शन हाऊस किंवा आमिर खानने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
नेमकं प्रकरण काय?
इंदूर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी व सोनम रघुवंशी यांचा विवाह ११ मे रोजी झाला. त्यानंतर २० मे रोजी हे दाम्पत्य हनिमूनसाठी सुरुवातीला बंगळुरूला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. गुवाहाटीहून हे दोघंही २३ मे रोजी शिलाँगमधील इस्ट खासी हिल्स या ठिकाणी गेले होते. मात्र, त्या ठिकाणाहून दोघंही बेपत्ता झाले. या दोघांनीही भाडे तत्त्वावर फिरण्यासाठी मिळणारी अॅक्टिव्हा घेतली होती अशी माहिती समोर आली. या ठिकाणी असलेल्या पर्वतरांगा पाहण्यासाठी हे दोघं गेले होते. त्यानंतर ते दोघेही बेपत्ता होते. पोलिसांना राजा रघुवंशी मृतदेह सापडला.
मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती राजाची हत्या करण्यासाठी सोनम रघुवंशीने मारेकऱ्यांना १५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. तिने राजाची हत्या झाल्यानंतर आरोपींना पैसे देण्याचे मान्य केले होते. यामध्ये सोनमचा बॉयफ्रेंड राजा कुशवाहाचाही हात होता.
दरम्यान, आमिर खान व जिनिलीया देशमुख यांच्या सितारे जमीन परला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता आमिर खान या हत्या प्रकरणावर चित्रपट काढणार आणि त्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असणार, आमिर खान अधिकृतपणे याची घोषणा कधी करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.