Sitaare Zameen Par Movie : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या २० जूनला चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशातच नुकतीच अभिनेत्याला एक मोठी ऑफर आली होती, परंतु त्याने ती ऑफर नाकारली आहे. आमिर खानने ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटासाठी तब्बल १२० कोटींची ऑफर नाकारली असल्याचं म्हटलं जात आहे.

‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर खान मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. आर. एस. प्रसन्न यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर आमिरने या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. अशातच आमिर खानने नुकतंच या चित्रपटाच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आमिर खानला एका ओटीटी प्लॅटफॉर्मकडून ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न करता त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची ऑफर आली होती.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी सांगितलं, ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने आमिर खानला त्याचा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर प्रदर्शित करण्यासाठी तब्बल १२० कोटींची ऑफर दिली होती. मात्र, आमिरने ही ऑफर नाकारली आहे. परंतु, इतर मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून याहून मोठ्या ऑफर याव्या याकरिता त्याने ही ऑफर नाकारली आहे अशी शक्याताही यावेळी वर्तवली जात आहे. कोमल नाहटा पुढे म्हणाल्या, “आमिरने सद्य परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे”.

आमिर खान गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी ओटीटवर येतो, या यासंदर्भात चिंता व्यक्त करत आहे; तर या बिझनेस मॉडेलला त्याने दोषही दिला होता. कोमल नाहटा पुढे म्हणाल्या, “‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित न करण्याचा आमिरचा निर्णय योग्य ठरला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली तर यानंतर इंडस्ट्रीतील अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित न होता चित्रपटगृहात प्रदर्शित केले जाण्याची दाट शक्याता आहे. यामुळे इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल घडू शकतो. पण, जर या चित्रपटाला चित्रपटगृहामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर ओटीटीसारख्या सोप्या मार्गाने १२० कोटी कमावण्याची संधी आमिरच्या हातून गेलेली असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार ‘सितारे जमीन पर’च्या निर्मात्यांनी चित्रपटगृहांना २० जून, शुक्रवारी सकाळी ९नंतर या चित्रपटाचे शो ठेवण्यास सांगितलं आहे. यासह या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटगृहांना विकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवार अशा आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईनुसार तिकिटांच्या दरात कुठलेही बदल करू नये असंही सांगितलं आहे.