Aamir Khans Father Forbade Him From Joining Films: आमिर खान ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले. आमिर खानबरोबर या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुख दिसणार आहे.

आज आमिर खान हा बॉलीवूडमधील यशस्वी व प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचे अभिनय क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे. आमिर खानचे वडील चित्रपट निर्माते होते. मात्र, तरीही अभिनेता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे आमिर खानसाठी सोपे नव्हते.

आमिरचे वडील ताहिर हुसैन यांना वाटत नव्हते की त्यांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात काम करावे, चित्रपटसृष्टीत करिअर करावे. हे क्षेत्र अस्थिर असल्याने मुलांनी या क्षेत्रात काम करण्यास त्यांचा नकार होता. आमिर खानचे चुलते नासिर हुसैन हे यशस्वी चित्रपटनिर्माते होते. मात्र, आमिर खानच्या वडिलांना चित्रपटसृष्टीवर फारसा विश्वास नव्हता.

माझे पालक चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या विरोधात

नुकत्याच पार पडलेल्या वेव्हस समिटमध्ये आमिर खानने याबद्दल खुलासा केला. आमिर खान म्हणाला, “मी अशा कुटुंबात वाढलो, जिथे माझे वडील हे चित्रपट निर्माते होते. पण, आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला चित्रपटांपासून दूर राहायचं आहे. माझे पालक चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या विरोधात होते. त्यांना माहीत होते की हे अस्थिर क्षेत्र आहे.”

पुढे आमिर खान म्हणाला, “चित्रपटात काम करण्यासाठी मला माझ्या कुटुंबाविरोधात जावे लागले. यावर काही चर्चा करण्याची गरज नाही, असे त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले. माझ्या वडिलांना पटकन राग यायचा, त्यामुळे त्यांच्या समोर बोलण्याचे माझे धाडस नव्हते.”

आमिर खानने पुढे सांगितले की, त्याने एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. ते काम शबाना आझमी यांनी बघितले. शबाना आझमींनी त्याचे कौतुक केले. ज्यावेळी त्यांना समजले की आमिर ताहिर हुसैन यांचा मुलगा आहे, त्यावेळी ताहिरला याबद्दल सांगेन असे त्या म्हणाल्या. मात्र, आमिर खानने त्यांना वडिलांना त्याच्या अभिनयाबद्दल काहीही न बोलण्याबद्दल सांगितले. आमिर खान याबद्दल म्हणाला की मी शबाना आझमींना सांगितले, तुम्ही माझ्या वडिलांना काहीही सांगू नका, नाही तर मी अभिनेता होण्यासाठी जिवंत राहणार नाही.

आमिर खानने असेही सांगितले की शाळेत दोन विषयात नापास झाल्याने त्याच्या वडिलांनी त्याला टेनिस खेळू दिले नव्हते. त्यानंतर आमिर खानने कधीही टेनिस खेळले नाही.

आमिर खानने त्याचे चुलते नासिर हुसैन यांच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून पदार्पण केले. बॉलीवूडमध्ये आमिर खान ३६ वर्षांहून अधिक काळ काम करीत आहे. आता प्रेक्षक त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.