Singer Rishabh Tandon wife Olesya Nedobegova emotional post : गायक, अभिनेता ऋषभ टंडनचे ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहते ऋषभला श्रद्धांजली वाहत आहेत. आता ऋषभची पत्नी ओलेस्या नेदोबेगोवा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करून भावनांना वाट मोकळी करून दिली.

ऋषभची पत्नी ओलेस्या ही मूळची रशियाची आहे. ओलेस्याने ऋषभबरोबरचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंबरोबर तिने हृदय पिळवटून टाकणारं कॅप्शन लिहिलं आहे. शब्द सापडत नाहीयेत, तू सोडून गेलास असं ओलेस्या म्हणाली. ओलेस्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भावुक कमेंट्स केल्या आहेत.

“मला शब्द सापडत नाहियेत… तू मला सोडून गेलास….. माझा प्रिय नवरा, मित्र, जोडीदार…मी शपथ घेते की मी तुझी सगळी स्वप्ने पूर्ण करेन… तू गेला नाहियेस, तू अजून माझ्याबरोबर आहेस, माझा आत्मा, माझं हृदय, माझं प्रेम, माझा किंग,” असं ओलेस्याने लिहिलं.

पाहा पोस्ट

ऋषभ टंडन कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेला होता. तिथेच त्याचं हार्ट अटॅकने निधन झालं. ४२ वर्षांच्या ऋषभचं अचानक निधन झाल्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते ओलेस्याच्या या पोस्टवर कमेंट्स करून ऋषभला श्रद्धांजली वाहत आहेत.

ऋषभ टंडन हा एक गायक, संगीतकार आणि अभिनेता होता. तो ‘फकीर’ या नावाने ओळखला जायचा. ऋषभ टंडन काही वर्षांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. त्याचं नाव अभिनेत्री सारा खानशी जोडलं गेलं होतं, पण साराने या अफवा असल्याचं म्हटलं होतं.

ऋषभने नंतर मूळची रशियाची असलेल्या ओलेस्या नेडोबेगोवाशी लग्न केलं. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, ऋषभने त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. “लग्नानंतरचं आयुष्य खूप रोमांचक आहे. माझी पत्नी ओलेस्या रशियाची आहे. भाषेतील अडथळे आणि सांस्कृतिक फरकांमुळे काही आव्हानं येतात, पण प्रेमामुळे आम्ही त्या अडथळ्यांवर मात केली,” असं ऋषभ टंडन म्हणाला होता.