Actress Madhumati Passed Away : महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका करणारे अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीतून आणखी एक वाईट बातमी आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुमती व नृत्यांगना यांचे निधन झाले आहे. मधुमती यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मधुमती यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मधुमती यांची तुलना त्यांच्या काळातील हेलेनसारख्या अभिनेत्रींबरोबर केली जात असे. मधुमती त्यांच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्यासाठी आणि अभिनयासाठी ओळखल्या जायच्या. मधुमती यांनी ‘आंखे’, ‘टॉवर हाऊस’, ‘शिकारी’ आणि ‘मुझे जीने दो’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने एक पोस्ट शेअर करून मधुमती यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही मधुमती यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अक्षयने फोटो शेअर करत लिहिलं, “माझ्या पहिल्या गुरू. मला नृत्याबद्दल जे काही माहित आहे ते सगळं मी तुमच्याकडून शिकलो, मधुमती जी. तुम्ही कायम आठवणीत राहाल. ओम शांती.”
अक्षय कुमारची पोस्ट

१९३८ साली महाराष्ट्रात जन्मलेल्या मधुमती यांनी १९५७ मध्ये एका रिलीज न झालेल्या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांनी भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली यासारख्या शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी अनेक हिट गाण्यांमध्ये आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
मधुमती यांनी वयाच्या १९ व्या वर्षी डान्सर दीपक मनोहरशी लग्न केलं होतं. दीपक मनोहर मधुमतीपेक्षा वयाने खूप मोठे होते. त्यांना पहिल्या लग्नापासूनच चार अपत्ये होती. मधुमती यांची आई या नात्याबद्दल खूश नव्हती. पण मधुमती यांनी आपला निर्णय बदलला नाही आणि आयुष्यभर पतीबरोबर राहिल्या. मधुमती यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना गमावली आहे.