Actress Sulakshana Pandit was in Love with Sanjeev Kumar : गायिका व ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं ७१ व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सुलक्षणा पंडित यांचे भाऊ संगीतकार ललित पंडित यांनी बहिणीच्या निधनाची माहिती दिली. सुलक्षणा पंडित यांच्यावर आज, शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जातील.
सुलक्षणा पंडित यांच्या निधनाची बातमी समोर आल्यावर चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. गायन व अभिनय दोन्ही क्षेत्रात आपल्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं आणि एका पर्वाचा अंत झाला.
सुलक्षणा पंडित या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्यांचं अभिनेते संजीव कुमार यांच्यावर प्रेम होतं. पण संजीव यांनी सुलक्षणा यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तरीही सुलक्षणा यांनी संजीव यांची शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घेतली. संजीव यांच्या निधनाचा मोठा धक्का बसला व सुलक्षणा पंडित खचल्या. सुलक्षणा पंडित यांचं फिल्मी करिअर, त्यांचं संजीव कपूरवर असलेलं प्रेम आणि आयुष्यातील चढ-उतार याबद्दल जाणून घेऊयात.
९ वर्षांच्या असल्यापासून काम करत होत्या सुलक्षणा पंडित
सुलक्षणा पंडित नऊ वर्षांच्या असल्यापासून रंगमंचावर आणि चित्रपटांमध्ये काम करत होत्या. त्यांनी १९६७ साली लता मंगेशकर यांच्याबरोबर ‘सात समंदर पार से, पापा जल्दी आना’ मधील ‘तकदीर’ गाण्यापासून सुरुवात केली. नंतर अनेक गाणी गायली, चित्रपटही केले. त्यांनी किशोर कुमार व मोहम्मद रफी यांच्याबरोबर परफॉर्म केलं होतं.

सुलक्षणा यांचे भाऊ जतिन पंडित एकदा म्हणालेले, “सुलक्षणा परफॉर्म करायची, त्यातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.” दिलीप कुमार यांनी सुलक्षणाला सुरुवातीच्या काळात संगीतकार नौशाद यांच्याकडे पाठवलं. १३ व्या वर्षी मोहम्मद रफी यांनी गाताना ऐकलं आणि नंतर परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केलं. “आमच्या कुटुंबातून पहिल्यांदा सुलक्षणा मोहम्मद रफीबरोबर परदेशात गेली होती” असं जतिन म्हणाले होते.
सुलक्षणा पंडित यांचं अभिनयात पदार्पण व संजीव कुमारशी भेट
सुलक्षणा पंडितने गायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली. नंतर अभिनयात पाऊल ठेवलं. त्यांचा पहिला चित्रपट ‘उलझन’ (१९७५) संजीव कुमार यांच्याबरोबर होता. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटादरम्यान त्या संजीव यांच्या प्रेमात पडल्या. संजीव कपूर यांचं हेमा मालिनींवर प्रेम होतं. हेमा व संजीव लग्न करणार होते, पण संजीव यांनी लग्नानंतर काम न करण्याची अट हेमासमोर ठेवली आणि त्यामुळे हेमा यांनी ऐनवेळी लग्नास नकार दिला आणि नंतर धर्मेंद्र यांच्याबरोबर संसार थाटला. सुलक्षणा भेटल्या तेव्हा संजीव हेमा मालिनीबरोबरच्या प्रेमभंगातून सावरत होते. सुलक्षणा अनेकदा संजीवच्या प्रेमाबद्दलच्या गोष्टी ऐकायच्या. संजीव त्यांच्यासमोर मन मोकळं करायचे. त्याच काळात त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. संजीवही आपल्यावर प्रेम करतील, असं त्यांना वाटत होतं. पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं.
सुलक्षणा यांनी मंदिरात संजीव कुमारना केलेलं प्रपोज
संजीव प्रेमभंगामुळे दुःखी होते, त्यातच ते दारू पिऊ लागले. नंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि बायपास सर्जरीसाठी त्यांना अमेरिकेला नेण्यात आलं. उपचारानंतर परत आल्यावर सुलक्षणाने त्यांना प्रेम आणि श्रद्धेने एका मंदिरात नेलं. त्यांनी संजीव यांना प्रपोज केलं, पण त्यांनी नकार दिला. पण तरीही, सुलक्षणा यांनी कधीच त्यांची साथ सोडली नाही. त्या त्यांची काळजी घेत राहिल्या.
संजीव यांच्या निधनाने बसला धक्का
सुलक्षणा पंडित यांनी अनेक गाणी गायली, चित्रपट केले. पण १९८५ साली संजीव यांचं निधन झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला. संजीव गेल्यानंतर त्या नैराश्यात गेली. काही काळाने त्यांच्या आईचंही निधन झालं, यामुळे त्या प्रचंड हादरल्या. “या लोकांच्या मृत्यूचा माझ्यावर कायमस्वरुपी परिणाम झाला. माझ्या आरोग्यावर परिणाम झाला. मी बराच काळ मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, हादरले होते,” असं सुलक्षणा एका मुलाखतीत म्हणाली होत्या.
पुढे सुलक्षणा फिल्म इंडस्ट्रीपासून दुरावल्या. कामाच्या ऑफर मिळणं कमी झालं. सुलक्षणा या दुःखातून सावरून आयुष्यात पुढे जाऊ शकल्या नाही. त्यांनी लग्नही केलं नाही. २००६ मध्ये, त्यांची धाकटी बहीण विजयता पंडित आणि तिचे पती, संगीतकार आदेश श्रीवास्तव यांनी सुलक्षणा यांना आपल्याबरोबर राहायला नेलं. त्यानंतर बहीण विजयता व भाऊ जतिन व ललित पंडित यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सुलक्षणा यांची काळजी घेतली. सुलक्षणा पंडित यांचं गुरुवारी, ६ ऑक्टोबर रोजी नानावटी रुग्णालयात निधन झालं.
