बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी मोठा हल्ला झाला. चोराने सैफच्या राहत्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अशा पद्धतीने हल्ला झाल्यावर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. तसेच सैफबद्दल काळजी व्यक्त करत सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. अभिनेत्री उर्वशी रौतेलानेदेखील यावर तिची प्रतिक्रिया दिली होती.

मात्र, तिने दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांना काहीशी खटकली आणि सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. सध्या उर्वशीला अनेक नेटकरी ‘ब्यूटी विदाउट ब्रेन’ म्हणून ट्रोल करत आहेत. ट्रोलर्सच्या निशाण्यावर असताना आता अभिनेत्रीने स्वत: यावर आपलं उत्तर दिलं आहे. उर्वशीने नुकतीच ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला मुलाखत दिली. यावेळी तिने ट्रोलर्सला तिच्या अंदाजात उत्तर दिलं आहे.

ट्रोलर्सना उर्वशीचं उत्तर

उर्वशीला विचारण्यात आलं की, “तुला सध्या ‘ब्यूटी विदाउट ब्रेन’ म्हणून ट्रोल करत आहेत.” त्यावर उत्तर देत ती म्हणाली, “लोकं असे आहेत की, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील टीका करतात. इतकंच नाही तर माझे आवडते कलाकार सलमान खान आणि शाहरूख खान अशा मोठ्या व्यक्तींनासुद्धा लोक सोडत नाहीत; तर आता तुम्हीच सांगा यावर काय करावे.”

ट्रोल होण्याआधी उर्वशी नेमकं काय म्हणाली होती?

सैफवर झालेल्या हल्ल्यावर उर्वशीने माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. तिने तिचं महागडं घड्याळ दाखवल्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे. त्यावेळी तिने ‘एएनआय’ला मुलाखत दिली होती. त्यात ती म्हणाली होती की, “घडलेली घटना अत्यंत वाईट आहे. एकतर ‘डाकू महाराज’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच माझ्या आईने नुकतेच मला हिऱ्यांनी जडलेलं रॉलेक्स घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं आहे. माझ्या वडिलांनीसुद्धा मला महागडी वस्तू गिफ्ट म्हणून दिलेली आहे. त्यात सध्या अशा घटना घडत असल्याने इतक्या महागड्या वस्तूंसह आम्ही मोकळेपणाने बाहेर फिरणार कसे?”

उर्वशीने दिलेल्या याच प्रतिक्रियेने नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली. तसेच अनेक जण तिला ‘ब्यूटी विदाउट ब्रेन’ असं म्हणू लागले आहेत. उर्वशीने यावर दिलेल्या उत्तरात तिने थेट सलान खान आणि शाहरूख खानचं नाव घेतल्याने आता यावरूनही तिला ट्रोल केलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वशी रौतेला नुकतीच ‘डाकू महाराज’ या चित्रपटात झळकली. हा एक तेलगू चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. लवकरच उर्वशी ‘ब्लॅक रोज’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘कसूर २’ या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.