सुपरस्टार प्रभास, क्रिती सॅनॉन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ‘आदिपुरु’ष हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी केली. शिवाय प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. मात्र ‘आदिपुरुष’ने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स, पात्र यावरुन टीका होताना दिसत आहे. तसेच काही प्रेक्षक नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.
काही लोक चित्रपटात रामायणातील दृश्ये चुकीच्या पद्धतीने दाखवली जात असल्याचा आरोप करत आहेत. मनोज मुंतशीर यांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या संवादांवरही जोरदार टीका होत आहे. या सगळ्यात आता चित्रपटाच्या निर्मात्यांवर मोठा आरोप करण्यात आला आहे. ट्विटरवरून नकारात्मक प्रतिक्रिया काढून टाकण्यासाठी निर्मात्यांनी पैसे दिल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.
काही युजर्सनी ट्वीट करत हा दावा केला आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, “काही एजन्सी मला टी-सीरीज आणि आदिपुरुष निर्मात्यांच्या वतीने मेसेज करत आहेत आणि माझे ट्विट हटवण्याची विनंती करत आहेत. त्या बदल्यात ते मला पैसेही देऊ करत आहेत. माफ करा तुम्ही लोक चुकीच्या व्यक्तीशी बोलत आहात.”
तर आणखी एका युजरने स्किनशॉर्ट शेअर करत लिहले आहे की, ‘आदिपुरुषची टीमने मला चित्रपटाचे सकारात्मक रिव्ह्यू देण्यासाठी ७५०० रुपये देण्याची ऑफर दिली आहे. पण तुम्ही ७५ हजार रुपयेही प्रति ट्वीटसाठी दिले तरी मी नाही करणार असे उत्तर प्रयाग नावाच्या यूजरने दिले आहे.
स्क्रीनशॉट शेअर करताना एका यूजरने असाही दावा केला आहे की, मेकर्सनी त्याला लाच देऊ केली. युजरने लिहिले की, ‘आदिपुरुषची टीम मला चित्रपटाचे सकारात्मक रिव्ह्यू दिल्याबद्दल प्रति ट्विटसाठी ९५०० रुपये देण्याविषयी बोलत आहे, पण मी तयार नाही.’
‘आदिपुरुष’ चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. चित्रपटात प्रभास राघवच्या भूमिकेत आहे, तर क्रिती सेनॉन जानकीच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खानने लंकेशची तर सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे. हनुमानाची भूमिका देवदत्त नागे यांनी केली आहे.