This Bollywood Actor Was First Choice For Madhuri Dixit’s Tejab : बॉलीवूडमधील अनेक कलाकार इंडस्ट्रीत त्यांचा काम करण्याचा अनुभव सांगताना नेपोटिझम, पक्षपातीपणा, राजकारण यांबद्दल बोलताना दिसतात. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्यानेही याबद्दल वक्तव्य केलं आहे.
१९८८ मध्ये आलेल्या एन. चंद्रा यांच्या ‘तेजाब’ चित्रपटामुळे माधुरी दीक्षित एका रात्रीत स्टार झाली, असं म्हटलं जातं. त्यातील तिचं ‘एक दो तीन’ हे गाणं त्या काळी प्रचंड गाजलेलं आणि आजही या गाण्याची क्रेझ कायम आहे. माधुरीसह यामध्ये अभिनेता अनिल कपूर झळकलेले. एन. चंद्रा यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. परंतु, तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटासाठी अनिल कपूर पहिली पसंती नव्हते तर एका वेगळ्याच अभिनेत्याची यासाठी निवड झालेली. हे अभिनेते म्हणजे अदित्य पंचोली.
तेजाबद्दल अदित्य पंचोली काय म्हणाले?
अदित्य यांनी नुकतीच एक्सवर पोस्ट शेअर करीत याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी अनिल कपूर यांच्या नावाचा उल्लेख न करता, त्यांच्यावरच आरोप केल्याचं दिसतं. एक्सवर पोस्ट शेअर करीत अदित्य यांनी लिहिलं, ” ‘तेजाब’साठी मी पहिली पसंती होतो आणि त्यामध्ये माधुरीसह मी झळकणार होतो. तुम्ही याबद्दल एन. चंद्रा यांनाही विचारून खात्री करून घेऊ शकता.” अदित्य यांनी पुढे, “दुर्दैवानं एका अभिनेत्यानं ज्याचा भाऊ निर्माता आहे आणि आजही ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत, त्यांनी दिग्दर्शकाकडे मला चित्रपटातून काढून टाकण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पुढे जे झालं, ते सगळ्यांनाच माहीत आहे” असं म्हटलं आहे.
अदित्य यांनी त्यावेळी ‘तेजाब’ चित्रपटातील नायक अनिल कपूर आणि त्यांचा निर्माता भाऊ म्हणजे बोनी कपूर यांच्यावर आरोप केल्याचं दिसतं. १९८० दरम्यान अदित्य पंचोली यांच्या करिअरची नुकतीच सुरुवात झालेली. त्यावेळी ते टेलिव्हिजनवर काम करीत होते आणि त्यासह ते चित्रपटांतूनही झळकत होते. त्यामुळे ‘तेजाब’ हातून जाणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. त्याच वर्षी त्यांनी ‘दयावान’ या चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षितबरोबर काम केलं.
इंडस्ट्रीतील राजकारणाबद्दल अदित्य पंचोलींची प्रतिक्रिया
अदित्य यांनी याच पोस्टमध्ये इंडस्ट्रीतील नेपोटीझम, पक्षपातीपणा, राजकारण याबद्दलही वक्तव्य केलं आहे. ते या पोस्टमधून म्हणाले, “मी नुकतंच एका अभिनेत्याला त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करताना नेपोटिझमबद्दल बोलताना पाहिलं. त्यामुळे मी हे स्पष्टपणे सांगेन की, इंडस्ट्रीत नेपोटिझमपेक्षाही राजकारण जास्त आहे. पक्षपातीपणा, पॉवर गेम या गोष्टी करिअरवर परिणाम करणाऱ्या आहेत.”
