अभिषेक बच्चनला अलिकडेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात अभिषेकने भावनिक भाषण केलं. भाषणात त्याने ऐश्वर्या रायचे आभार मानले. त्यानंतर ऐश्वर्या रायने इन्स्टाग्राम अकाउंटवर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

अभिषेक बच्चनला ‘आय वॉन्ट टू टॉक’मधील भूमिकेसाठी तर कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियनसाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना अभिषेक बच्चन भावुक झाला. “या वर्षी चित्रपटसृष्टीत मला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि मी या पुरस्कारासाठी किती वेळा भाषणाचा सराव केला आहे, हेही आता मला आठवत नाही. हे माझं एक स्वप्न होतं. मी खूप भावुक झालो आहे. ऐश्वर्या आणि आराध्या, मला बाहेर जाऊन माझी स्वप्ने पूर्ण करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की त्यांच्या बलिदानामुळेच मी हा पुरस्कार जिंकून इथे उभा आहे हे त्यांना समजेल,” असं अभिषेक बच्चन म्हणाला.

पॅरिस फॅशन वीक २०२५ मध्ये मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या काळ्या शेरवानीसारखा ड्रेस घालून ऐश्वर्या लॉरियलच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्या इव्हेंटमधील फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. तिने एक स्पार्कल इमोजी, एक रेड हार्ट इमोजी व एक हात जोडलेला इमोजी लिहून डिझायनर मनीष मल्होत्राला टॅग केलं. या फोटोवर अभिनेत्री भूमी पेडणेकरने “क्वीन” अशी कमेंट केली. तर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

ऐश्वर्या रायची पोस्ट

दरम्यान, ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चनला पुरस्कार मिळाला. ही अभिषेकसाठी एक अविस्मरणीय रात्र होती. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यावर तो भावुक झाला. तसेच अभिषेक वडील अमिताभ बच्चन यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त बिग बींच्या सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांवर थिरकला.

अभिषेक बच्चनच्या या परफॉर्मन्सचे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकच नाही तर त्याची आई जया बच्चन भावनिक झाल्या. नंतर अभिषेक सादरीकरणादरम्यान थांबला, स्टेजवरून खाली उतरला आणि भावुक झालेल्या आईकडे गेला. त्याने हळूवारपणे तिचा हात धरला, काही सेकंद तिच्यासोबत नाचला आणि तिला मिठी मारली आणि नंतर तिच्या कपाळावर प्रेमाने किस केलं. या पुरस्कार सोहळ्यात अभिषेक त्याची आई जया आणि बहीण श्वेता बच्चनबरोबर होता. पण ऐश्वर्या व आराध्या मात्र आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.