Hera Pheri 3 Director Talks About Paresh Rawal : ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ यांची बॉलीवूडमधील गाजलेल्या कॉमेडी चित्रपटांमध्ये गणना होते आणि परेश रावल त्यामधील महत्त्वाचा भाग समजले जातात. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिलेला, ज्यामुळे चित्रपटातील कलाकारांबरोबर त्यांचे वैचारीक मतभेद झाल्याच्या चर्चा सुरू होत्या.
परेश यांनी ‘हेरा फेरी ३’मध्ये काम करण्यास नकार दिल्यानंतर अक्षय कुमार या चित्रपटाचा निर्माता असल्याने त्याने परेश यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे चित्रपटाचं नुकसान होणार असल्यामुळे त्यांना नोटीस पाठवलेली. परंतु, नंतर अलीकडेच परेश यांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आणि मुलाखतीतून त्याबद्दल प्रतिक्रियाही दिली होती. अशातच आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
परेशवर दबाव टाकला जात होता – प्रियदर्शन
प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी ३’च्या पूर्वीच्या दोन भागांचं दिग्दर्शन केलं आहे आणि आता सध्या ते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या कामात व्यग्र आहेत. आता त्यांनी या चित्रपटातील कलाकारांबद्दल सांगितलं आहे. ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “परेश आणि माझ्यामध्ये कधीही कुठलाही वाद झाला नाही आणि माझ्या माहितीनुसार अक्षय व परेश यांच्यामध्येही कधीच वाद झाला नाही; पण काही गोष्टी अन् लोक असे आहेत, ज्यांच्यामुळे परेशवर दबाव टाकला जात होता.”
प्रियदर्शन परेश यांच्याबद्दल पुढे म्हणाले, “परेश अशी व्यक्ती आहे. म्हणजे काही लोकांना आपण आजारी आहोत, असं वाटून भीती वाटते आणि त्यावर ते खूप संवेदनशील होतात. त्याला एक वेगळीच समस्या आहे आणि त्यामुळे तो घाबरलेला असतो; पण तरीही आमचं नातं कधीच बिघडलं नाही”. अक्षय कुमारबद्दल दिग्दर्शक पुढे म्हणाले, “अक्षयनं मला सांगितलेलं की, जर हे चांगल्या पद्धतीनं घडणार असेल, तर पुढे जाऊयात. काही चुकीच्या गोष्टी आहेत, ज्यामुळे खूप काही घडलं. त्यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. आपण सगळं चांगलंच होईल, असा विचार करूयात. या क्षेत्रात जसे तुमचे मित्र, चाहते असतात तसे शत्रू आणि टीका करणारेही असतात”
‘हेरा फेरी ३’बद्दल दिग्दर्शक पुढे म्हणाले, “जर चित्रपटाची स्क्रिप्ट मला खरोखर आवडली, तरच मी चित्रपट करणार आहे. ज्या प्रेक्षकांनी यापूर्वीचे भाग पाहिले आहेत, त्यांना हा भागही आवडेल याची काळजी घेऊनच सगळं होणार आहे.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच परेश रावल यांनी, ‘हेरा फेरी ३’मध्ये ते असणार आहेत आणि लवकरच चित्रपटाचं काम सुरू होणार आहे, असं सांगितलेलं.