Akshay Kumar Rejected OMG Movie : अक्षय कुमार बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने विविध कथानक असलेल्या चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. यातील एक म्हणजे OMG चित्रपटातील भूमिका. परंतु, तुम्हाला माहित आहे का यासाठी त्याने आधी नकार दिला होता?

अक्षय कुमारने OMG चित्रपटातील भूमिकेसाठी नकार दिला होता आणि याचं कारण होते बिग बी अमिताभ बच्चन. या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी याबद्दल सांगितलं आहे. उमेश यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं की, “अक्षय कुमारला या चित्रपटासाठी तयार करणं खूप कठीण होतं. त्याने या चित्रपटातील श्रीकृष्णांची भूमिका साकारण्यास नकारच दिलेला कारण यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अशीच देवाची भूमिका त्यांच्या चित्रपटात साकारलेली.”

अक्षय कुमारची दिग्दर्शकाने काढलेली समजूत

दिग्दर्शक याबद्दल पुढे म्हणाले, “अमिताभ यांनी ‘गॉड तुसी ग्रेट हो’मध्ये देवाची भूमिका साकारलेली. पण तो चित्रपट फार चालला नाही. त्यामुळे अक्षयला वाटलं की जर अमिताभ बच्चन यांनी तशी भूमिका साकारुनही चित्रपट चालला नाही तर मग त्याने केली तर चित्रपट कसा चालेल? मी त्याला सांगितलं की आमचा त्याबद्दलचा दृष्टीकोण वेगला आहे. कारण आम्ही त्यांना चित्रपटात बाईक चालवताना आणि लॅपटॉप वापरताना दाखवणार आहोत आणि ऐरवी देवांच्या भूमिका दाखवल्या जातात तशी ही नसणार आहे.”

उमेश शुक्ला याबद्दल पुढे म्हणाले, “अक्षयला माझं म्हणणं पटलं. त्यानंतर त्याने ज्या नाटकावर हा चित्रपट आधारीत आहे ते नाटकही पाहिलं त्या लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून त्याला आनंद झाला. त्याला जाणवलं की, कथानक छान आहे आणि लोक ते स्वीकारत आहेत. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावेळी अक्षय, परेश आणि मला धमक्या दिल्या जायच्या पण जेव्हा प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना तो आवडला आणि त्यांचा गैरसमज दूर झाला.”

दरम्यान, उमेश शुक्ला दिग्दर्शित OMG हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झालेला. यामध्ये अक्षय कुमार परेश रावल महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेले. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग OMG 2 ही प्रदर्शित झालेला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला.