Akshay Kumar Talks About Wife Twinkle Khanna : अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिट कपलपैकी एक आहेत. त्यांची १९९० मध्ये सहकलाकार म्हणून चित्रपटाच्या सेटवर भेट झालेली. दोघांनी काही चित्रपटांत एकत्र कामही केलं आहे. परंतु, ट्विंकलने लग्न केल्यानंतर अक्षयबरोबर कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही. त्याच्याशी लग्न करण्यापूर्वी तिनं एक अटही ठेवलेली. अक्षय कुमारने याबद्दल सांगितलं आहे.

अक्षय कुमारनं ‘आप की अदालत’मध्ये हजेरी लावलेली. त्यावेळी त्यानं आमिर खानमुळे त्याचं ट्विंकलबरोबर लग्न झाल्याचं सांगत त्याचे आभार मानले आहेत. अक्षय म्हणाला, “आमिर खान व ट्विंकल खन्ना यांचा ‘मेला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हा आमचं अफेअर सुरू होतं. तेव्हा मी तिला लग्न करूयात का, असं विचारलेलं; पण तिला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे तिनं सांगितलेलं की, जर ‘मेला’ चित्रपट चालला नाही, तर ती माझ्याबरोबर लग्न करेन. लोकांना वाटलेला आमिर खानचा चित्रपट आहे आणि त्यामुळे तो चालेल.”

मित्राच्या घराच्या गच्चीवर झालेलं अक्षय-ट्वींकलचं लग्न

अक्षय कुमार पुढे याबद्दल म्हणाला, “सॉरी! आमिर खानसाहेब तुमचा तो चित्रपट चालला नाही; पण तुमच्यामुळे माझं लग्न झालं.” पुढे त्यानं सांगितलं की, लग्नाच्या दिवशी ६ वाजेपर्यंत ते त्यांच्या त्यांच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. पॅकअपनंतर त्यांनी एका जवळच्या मित्राच्या घराच्या गच्चीवर जवळच्या माणसांच्या साक्षीनं लग्न केलं.

अक्षय पुढे बायको ट्विंकल खन्नाबद्दल म्हणाला, “ती बोलताना विचार करीत नाही. जे तिच्या डोक्यात असतं, ते ती बोलते. आमचं जेव्हा नवीन लग्न झालेलं तेव्हा मी तिला माझ्या चित्रपटाच्या ट्रायल शोला घेऊन गेलो होतो. तिथे निर्मात्यानं तिला विचारलं की, वहिनी, चित्रपट कसा वाटला? त्यावर ती म्हणाली खूप वाईट आहे चित्रपट. तेव्हा मला वाटलेलं की, हा आता परत मला काम देईल की नाही.”

ट्विंकलबरोबरच्या संसाराबद्दल अक्षय कुमार पुढे म्हणाला, “आमच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. आमच्यात काहीही एकसारखं नाहीये. फक्त एक गोष्ट आमची सारखी आहे आणि ती म्हणजे तिलाही लवकर झोपायला व सकाळी लवकर उठायला आवडतं आणि मलाही. दुसरं तिलाही चित्रपट बघायला आवडतात आणि मलासुद्धा. तिलापण पार्ट्यांना जायला आवडत नाही आणि मलाही. त्यामुळे आमच्यामध्ये साम्य नसलं तरी हळूहळू आमच्या आवडी-निवडी एकसारख्या होत गेल्या.”