Akshay Kumar On Being One Of The Richest Actor : अक्षय कुमार देशातील श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. बरीच वर्षं अभिनेत्याची सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये गणना होत होती. त्यामुळे लोकांना त्याच्यासाठी पैसा सर्वस्व आहे, असं वाटतं. अशातच आता अभिनेत्यानं याबद्दल सांगितलं आहे.
अक्षय कुमार सध्या चर्चेत आहे तो त्याच्या ‘जॉली एलएलबी३’ या चित्रपटामुळे. त्यानिमित्त त्याने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावलेली. त्यामध्ये त्याने तरुणपणात त्याचे पैशांना घेऊन काय विचार होते याबद्दल माहिती दिली आहे. तो म्हणाला, “खूप वर्षांपूर्वी मी एक वृत्त वाचलेलं, ज्यामध्ये जितेंद्र यांनी त्यांची एफडी केली आहे १०० कोटी रुपयांची, असं लिहिलेलं. तेव्हा मी धावत धावत माझ्या वडिलांकडे गेलो आणि त्यांना, बाबा, जर कोणी १०० कोटी रुपयांची एफडी काढली, तर त्यातून किती व्याज मिळेल? असं विचारलं होतं.”
अक्षय पुढे त्याबद्दल म्हणाला, “त्यावेळी एफडीचं व्याजदर जवळपास १३ टक्के इतका होता म्हणजे १०० कोटी रुपयांच्या एफडीचे महिन्याला १.३ कोटी रुपये, असे व्याज होते. मला तेव्हा वाटलं की, ज्या दिवशी मी एफडीमध्ये गुंतवणूक करू शकलो की, त्यानंतर मला आर्थिकदृष्ट्या अडचणी येणार नाहीत. पण, माणूस कधीच समाधानी नसतो आणि तो आकडा माझ्यासाठी वाढत गेला. आधी १०० कोटी, मग एक हजार कोटी आणि त्यानंतर दोन हजार कोटी, अशी संख्या वाढत गेली.”
कपिलने त्यावेळी त्याला आता त्याची कितीची एफडी आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर अक्षय कुमार म्हणाला, ते मी तुला नाही सांगणार आणि हसला. त्यासह त्यानं ‘आप की अदालत’मध्येही हजेरी लावलेली. त्यावेळी त्याला लोकांना त्याच्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे, असं वाटतं का याबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर तो म्हणाला, “मी पैसे कमवतोय; पण काही लूटमारी करून थोडीच कमाई करतोय” अक्षय कुमा़र पैशांबद्दल पुढे म्हणाला, “जरी मी खूप पैसे कमवत असलो तरी ते माझ्या मेहनतीचे आहेत; चोरी नाही. मी काम करून ते कमवले आहेत. आठ वर्षं मी सर्वाधिक कर भरणारी व्यक्ती होतो. त्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही की, माझ्यासाठी पैसाच सर्वस्व आहे वगैरे आणि शेवटी पैसे फार महत्त्वाचे असतात आयुष्यात.”
अक्षय पुढे म्हणाला, “मी पैसे कमवतो, करही भरतो आणि त्या पैशांमधून जनसेवाही करतो. हा माझा धर्म आहे. बाकी कोणी काही बोलले तरी मला काही फरक पडत नाही. जोवर तुम्ही कोणाला लुबाडून पैसे कमवत नाही आहात, जोवर चोरी करून पैसे कमवत नाही आहात, जोवर तुम्ही मेहनतीने पैसे कमवत आहात, तोवर कुठलीच समस्या निर्माण होत नाही.”