आलिया भट्टने तीन वर्षांपूर्वी मुलगी राहा कपूरचे स्वागत केले. आलिया भट्टने आई झाल्यानंतर तिच्या जीवनशैलीतील बदलांबद्दल सांगितलं. काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये तिचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील सह-कलाकार वरुण धवनबरोबर हजेरी लावली. आलियाने तिचं झोपेचे रुटीन, रणबीर कपूरची दिनचर्या याबद्दल माहिती दिली. तसेच प्रसूतीनंतर वजन झपाट्याने कमी झाल्याने झालेल्या टीकेबद्दल आलियाने प्रतिक्रिया दिली.
आलिया भट्टने सांगितलं की ती नेहमी लवकर झोपते आणि लवकर उठते. “बाळ झाल्यानंतर तुमचं शरीर बदलतं. बरेचदा तुम्हाला उठायचं नसले तरी तुमचं बाळ तुम्हाला उठवतं,” असं आलिया म्हणाली. “मला झोपायला खूप आवडतं. कधीकधी मी रात्री ९:३० वाजता झोपते आणि मला माझे झोपेचे तास मोजायला खूप आवडतं. रणबीर माझ्यासारखाच आहे. तो माझ्यानंतर अर्धा तास झोपला असेल तरीही तो लवकर उठतो,” असं आलिया भट्टने नमूद केलं.
यानंतर चर्चा महिलांकडून ठेवल्या जाणाऱ्या सामाजिक अपेक्षांकडे वळली. महिलांवर प्रसूतीनंतर वजन कमी करण्याबद्दल कसा दबाव असतो, त्याकडे ट्विंकलने लक्ष वेधले. “बाळ झाल्यानंतर महिलांनी पुन्हा आधीसारखं झिरो साईज फिगरमध्ये यावं, अशी लोकांची अपेक्षा असते आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर ते तुमच्याबद्दल मतं बनवतात,” असं ट्विंकल म्हणाली. काजोलने ट्विंकलच्या विधानावर सहमती दर्शवली. तसेच वजनावरून जज करणं हे फक्त पुरुषच नाही तर महिलाही करतात, असंही काजोल म्हणाली.
वजनाबद्दल आलिया भट्ट म्हणाली…
आलिया भट्टने तिचा अनुभव अगदी उलट होता, असं सांगितलं. “राहाला जन्म दिल्यानंतर माझे वजन खूप लवकर कमी झाले. स्तनपानामुळे खूप कॅलरीज बर्न होतात. मी पोषक आहार घेत होते, त्यामुळे वजन नैसर्गिकरित्या कमी झाले. पण जेव्हा माझा एक फोटो व्हायरल झाला, तेव्हा मी वजन कमी करण्यासाठी अनैसर्गिक पद्धती वापरल्या असाव्यात असा दावा ट्रोलर्सनी केला. काही म्हणाले, ‘तिने इतक्या लवकर वजन का कमी केलं?’ काही जणांनी मात्र परिस्थिती समजून घेत सकारात्मक कमेंट्स केल्या होत्या. पण खरं तर माझं वजन आपाओपच कमी झालं होतं,” असं आलिया भट्ट म्हणाली.
आता लोकांचे महिलांबद्दलचे दृष्टिकोन बदलत आहेत, त्याचे आलिया भट्टने कौतुक केले. आता लोक महिलांना वजनावरून तुलनेने कमी बोलतात. त्यांना स्वतःचं शरीर, बदल स्वीकारायला प्रोत्साहन देतात, याचं कौतुक वाटतं; असं आलिया सांगते.