बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूकमुळे चर्चेत आली आहे. २४ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलची सांगता झाली. यावेळी अभिनेत्रीने केलेल्या हटके लूकची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसली. आलियाने पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. अशातच नुकतीच आलियाने ‘ब्रुट इंडिया’शी संवाद साधला होता.
‘ब्रुट इंडिया’शी संवाद साधताना आलियानं सिनेमा, कला यांबद्दल तिची मतं मांडली. यावेळी तिनं अभिनेता फहाद फासिलबद्दलही वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली, “फहाद फासिलच्या कामाचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे. ‘आवेशम’ हा माझा आवडता चित्रपट आहे. मला त्याच्यासह काम करण्याची इच्छा आहे.”
आलियानं त्याच्यासह अभिनेता रोशन मॅथ्यूचंही कौतुक केलं आहे. रोशनबद्दल बोलताना ती म्हणाली, “आपल्याकडे खूप चांगले कलाकार आहेत. मला ‘डार्लिंग’मध्ये रोशन मॅथ्यूबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. तो एक उत्तम अभिनेता आहे. आजवर त्यानं अनेक मल्याळी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तो हिंदीतही काम करू पाहत आहे.”
आलिया भट्टनं यादरम्यान प्रादेशिक भाषेतील कलाकृतींचंही कौतुक केलं आहे. प्रादेशिक चित्रपटांबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “कोरोनानं मला एक गोष्ट शिकवली की, आपण प्रत्यक्षात एकत्र आहोत आणि आता आपल्याला एकाच ठिकाणी सर्वांना पाहता येणारं जागतिक व्यासपीठ उपलब्ध आहे. या व्यासपीठाद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचं मनोरंजन पाहू शकता”
आलिया भट्टनं आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मुलीच्या जन्मानंतरही आलिया अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच सक्रिय असल्याचे दिसते. तिने आजवर ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘कलंक’, ‘गल्ली बॉय’, ‘राझी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं ‘आर.आर.आर.’ या दाक्षिणात्य चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
आलिया राष्ट्रीय पुरस्कारविजेती अभिनेत्री असून तिनं आजवर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रत्येक चित्रपटातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. तर लवकरच ती ‘अल्फा’, ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटांतून झळकणार आहे. ‘अल्फा’मध्ये तिच्यासह अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार असून, ‘लव्ह अँड वॉर’मध्ये तिच्यासह अभिनेता रणबीर कपूर व विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहेत.